शरद पवार अॅक्शन मोडवर, महायुतीच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची शॅडो कॅबिनेट
महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शरद पवार अॅक्शन मोडवर आले असून पुढील तीन महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिले आहेत. पक्षाचा विस्तार करताना नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि खासदारांची मुंबईत बैठक आयोजित केली होती. महायुतीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो पॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच जयप्रकाश दांडेगावकर, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे, हर्षवर्धन पोटील यांच्यावर विविध जिह्यांमध्ये पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
या बैठकीनंतर खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, पक्षाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणारी टीम तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय पक्षातील विविध जबाबदाऱ्यांचे विभागनिहाय वाटप करण्यात आले आहे. येत्या 7 मार्चपासून पक्षाच्या नेत्यांचे विभागनिहाय दौरे सुरू होतील.
या नेत्यांवर पुढील तीन महिन्यांत राज्यातील विविध जिह्यांचे दौरे करण्याचे आदेश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. पक्षातील रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या बैठकीतील निर्णयानुसार राजेश टोपे व जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर मराठवाडय़ाची, अनिल देशमुख व राजेंद्र शिंगणे यांच्यावर विदर्भाची, जितेंद्र आव्हाड व सुनील भुसारा यांच्यावर कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांच्यावर सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी फहाद अहमद यांची नियुक्ती केली.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरु होत आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याबाबत महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय होईल. या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाबाबत जो प्रस्ताव दिला जाईल त्यावर सरकारने विचार करावा, असा ठराव या बैठकीत मांडण्यात आला.
पक्षाच्या नेत्यांनी नव्या उमेदीने कामाला लागावे. नवीन चेहऱ्यांना संधी द्या. पुढाल तीन महिन्यांत महाराष्ट्र पिंजून काढा आणि त्याचा अहवाल सादर करा. – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
Comments are closed.