मिठीतील गाळ काढण्याच्या टेंडरमध्ये 90 कोटींचा घोटाळा; शिवसेना नेते अनिल परब यांचा हल्ला, अॅण्टी करप्शनकडून चौकशी करण्याची मागणी

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या टेंडरमध्ये 90 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. टेंडरमध्ये हेराफेरी करून हा घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब यांनी केला. मिठी नदी गाळ काढण्याच्या कामात आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीकडून चौकशी सुरू केली असतानाही हा टेंडर घोटाळा सुरू असल्याचे परब यांनी उघड केले आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मिठी नदी गाळ काढण्याच्या प्रकल्पात झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीला सुरुवात केली आहे. अनिल परब यांनी महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांना त्यासंदर्भात एक सविस्तर पत्र लिहिले आहे. चौकशी सुरू असतानाही मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी दिलेल्या निविदेमध्ये हेराफेरी झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या घोटाळय़ाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पर्जन्य जलवाहिन्या विभागाने मशीन/एक्सपॅव्हेटर निर्दिष्ट न करता आणि गाळ काढण्याचा कोणताही अनुभव नसताना ‘35 मीटर लांबीचा बूम’ वापरण्यासाठी एक विशिष्ट अट निविदेत जोडली आहे. मे. वैभव हायड्रॉलिक्स या एका विशिष्ट पंपनीला फायदा करण्याच्या हेतूने ते केले गेले असल्याचे अनिल परब म्हणाले.
विधिमंडळ अधिवेशनात हक्कभंग आणणार
यासंदर्भात आपण महापालिकेला पत्र लिहूनही त्याचे उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे संबंधित महापालिका अधिकाऱ्यांविरुद्ध येत्या विधिमंडळ अधिवेशनात हक्कभंग आणणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.
Comments are closed.