वर्षाच्या अखेरीस EU सह मुक्त व्यापार करार
धोरणात्मक सहकार्य वाढवणार : पंतप्रधान मोदी यांची युरोपियन युनियन अध्यक्षांमध्ये महत्त्वाची चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्यात शुक्रवारी दिल्लीत महत्त्वाची चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि युरोपियन युनियनमधील धोरणात्मक भागीदारीला नवीन गती देण्यावर लक्ष केंद्रित केले. संरक्षण, सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत-ईयू धोरणात्मक भागीदारीचा विस्तार करण्याचे वचन दोघांनीही दिले. यासोबतच, युरोपियन युनियन आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापार करार या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल असेही सांगण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी भारत आणि युरोपियन युनियनमधील भागीदारीचे वर्णन ‘नैसर्गिक आणि सेंद्रिय’ असे केले आहे.
ईयू अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन ‘ईयू कॉलेज ऑफ कमिशनर्स’ म्हणजेच गटातील 27 सदस्य देशांच्या वरिष्ठ राजकीय नेत्यांसह भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यादरम्यान लेयेन यांनी पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेनंतर सांगितले की, आम्हाला भारतासोबतचे युरोपियन युनियनचे संबंध नवीन उंचीवर नेऊ इच्छितात. जपान आणि दक्षिण कोरियासोबत झालेल्या करारांप्रमाणेच युरोपियन युनियन भारतासोबत भविष्यातील ‘सुरक्षा भागीदारी’ची अपेक्षा करत असल्याचे युरोपियन युनियनच्या अध्यक्षांनी एका थिंक टँकला संबोधित करताना सांगितले.
भारत-पश्चिम आशिया-युरोप आर्थिक कॉरिडॉर (आयएमईईसी) पुढे नेण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आयएमईईसी कॉरिडॉर जागतिक व्यापार, शाश्वत विकास आणि समृद्धी वाढविण्यासाठी गती देईल. भारत आणि युरोपियन युनियन इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धीच्या महत्त्वावर सहमत आहेत, असे भारत आणि युरोपमधील कनेक्टिव्हिटीच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले.
युरोपियन युनियनकडून सुरक्षाविषयक हमी
भारत आपल्या लष्करी पुरवठ्यात विविधता आणण्यासाठी आणि नवीन क्षमता मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. भारताची सुरक्षाविषयक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आम्ही एकमेकांना मदत करू शकतो, असे उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी युरोपियन युनियन (ईयू) कॉलेज ऑफ कमिशनर्सचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लेयेन यांनी आभार मानले.
Comments are closed.