उत्तराखंडमधील हिमस्खलन, 32 लोकांनी वाचवले
अजून 25 कामगार अडकलेले : बर्फाचा डोंगर कोसळला : चमोलीच्या माना गावात हिमनदी फुटल्याने हाहाकार
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ भागात भारत-तिबेट सीमेजवळील माना गावात असलेल्या सीमा रस्ते संघटनेची (बीआरओ) छावणी शुक्रवारी हिमस्खलनाच्या कचाट्यात सापडली. घटनेवेळी छावणीत एकूण 57 कामगार उपस्थित होते. त्यापैकी 32 कामगारांना सायंकाळपर्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. मात्र, 25 कामगार अजूनही बर्फात अडकले असून त्यांच्या बचावाचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. वाचविण्यात आलेल्या सर्वांना जवळच्या माना गावात असलेल्या लष्करी छावणीत नेण्यात आले आहे.
बद्रीनाथ धाममध्ये हिमनदी फुटल्याने शुक्रवारी सकाळी 57 कामगार बर्फाखाली गाडले गेले. कामगारांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मदत आणि बचाव पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या 32 पैकी 4 कामगारांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. अपघातानंतर समोर आलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये अपघातस्थळी गुडघ्यापर्यंत बर्फ साचलेला आणि सतत बर्फवृष्टी होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. काही कामगारांना वाचविण्यात आले असले तरी इतरांचा शोध सुरू आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा हे सर्व कामगार बद्रीनाथ धाममध्ये रस्ता बांधकामाच्या कामात गुंतले होते. चमोली जिल्हा पोलीस-प्रशासन अधिकारी आणि बीआरओ टीमचे सदस्य घटनास्थळी उपस्थित आहेत. माना गावाच्या सुमारे एक किलोमीटर आधी आर्मी कॅम्पजवळील रस्त्यावर हा अपघात झाल्याचे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन कमांडर अंकुर महाजन यांनी सांगितले.
उत्तराखंडमधील चारधाम यात्रेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बद्रीनाथ धामपासून तीन किलोमीटर पुढे असलेल्या माना गावाजवळ रस्त्यावरील बर्फ काढून त्याची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शुक्रवारी सकाळीही एका खासगी कंत्राटदाराचे 57 कामगार रस्त्यावरून बर्फ काढत असताना अचानक डोंगरावरील हिमनदी फुटली आणि सर्व कामगार बर्फाखाली गाडले गेले. बीआरओ कमांडर अंकुर महाजन यांनी अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच सीमा रस्ते संघटना आणि जिल्हा पोलीस-प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दुपारपर्यंत बर्फाखाली गाडलेल्या 10 कामगारांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले होते. त्यानंतर इतरांचाही शोध सुरू होता.
सध्या बद्रीनाथ धाममध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. सामान्य जीवन पूर्ववत करण्यासाठी, रस्त्यांवरील बर्फ काढून टाकला जात आहे. बर्फवृष्टीमुळे बचाव कार्यात अडचण येत आहे. तरीही मदत व बचाव कार्यातील पथके बर्फातून कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
आयटीबीपी आणि लष्कराचीही मदत
घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराच्या आयबेक्स ब्रिगेडने त्वरित कारवाई केली. 100 हून अधिक सैनिक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि अवजड उपकरणांसह सैन्य घटनास्थळी पोहोचले. दुपारी 12 वाजेपर्यंत बचाव पथकाने 10 जणांना वाचवले. वाचवलेल्यांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित लोकांना बाहेर काढण्यासाठी जलद बचावकार्य सुरू आहे. या भागात वारंवार होणाऱ्या हिमस्खलनांमुळे बचावकार्य संथगतीने आणि अत्यंत सावधगिरीने केले जात आहे. बचाव आणि वैद्यकीय मदत जलद करण्यासाठी जोशीमठहून माना येथे अतिरिक्त वैद्यकीय संसाधने पाठवण्यात आली आहेत.
मुख्यमंत्र्यांची बचावकार्यावर देखरेख
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. तसेच लष्करी जवान, आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांकडून बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही आयटीबीपीची मदत घेत आहोत. जिल्हा प्रशासन आणि इतर सर्वजण बचाव पथकाच्या संपर्कात आहेत. आम्ही शक्य तितक्या लवकर सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व कामगार सुरक्षित राहावेत अशी प्रार्थना करतो, असे ते पुढे म्हणाले.
Comments are closed.