अर्थव्यवस्थेवरील संकटाचे ढग उचलत असल्याचे चिन्हे

तिसऱ्या तिमाहीत 6.2 टक्के विकासदर : ग्रामीण क्षेत्रातील मागणी वाढली : कृषिक्षेत्राची दमदार कामगिरी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने 2025 आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी जीडीपीचे आकडे जारी केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा विकासदर 6.2 टक्के राहिला आहे. यापूर्वी दुसऱ्या तिमाहीत सुधारित विकासदर 5.6 टक्के इतका राहिला होता. नवे आकडे शुक्रवारी जारी करण्यात आले. तिसऱ्या तिमाहीतील विकासदर 6.3 टक्क्यांच्या अनुमानापेक्षा काहीसा कमी राहिला आहे. परंतु पूर्ण वर्षाचा विकासदर अनुमानानुसार 6.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात कृषिक्षेत्राने दमदार कामगिरी केली असून उत्पादन क्षेत्राने अद्याप जोर पकडला नसल्याचे दिसून आले आहे.

तिसऱ्या तिमाहीत 6.3 टक्के विकासदर पहायला मिळू शकतो असा अनुमान सरकारने व्यक्त केला होता, तर सरकारच्या अनुमानापेक्षा हा दर कमी राहिला आहे. परंतु तिमाही आधारावर देशाच्या विकास दरात वाढ झाली आहे, कारण सप्टेंबर तिमाहीत देशाचा विकासदर 5.4 टक्के होता. जुलै ते सप्टेंबर तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला होता. हा दर 7 तिमाहींमध्ये सर्वात कमी राहिला होता. परंतु आता सुधाराचे संकेत मिळत आहेत.

2025 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी वास्तविक जीडीपी 47.17 लाख कोटी रुपये राहण्याचा अनुमान आहे. तर 2024 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत हे प्रमाण 44.44 लाख कोटी रुपये राहिले होते. ग्रॉस व्हॅल्यू अॅडेडमध्ये देखील वार्षिक आधारावर 6.2 टक्क्यांची वृद्धी झाली आहे.

जीडीपीतील वृद्धीचे कारण

जीडीपीतील वृद्धीमागे चांगल्या मान्सूननंतर ग्रामीण क्षेत्रातील मागणीत सुधारणा, पायाभूत विकासावर सरकारच्या खर्चात वाढ आणि सणासुदीच्या काळात मागणीवर आधारित क्षेत्रात सुधार कारणीभूत आहे. परंतु 6.2 टक्क्यांचा वृद्धीदर मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या 8.6 टक्क्यांपेक्षा कमी आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी विकासदर 6.5 टक्के दर राहण्याचा अनुमान सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. हा आकडा पूर्वीच्या 6.4 टक्क्यांच्या अनुमानापेक्षा काहीसा अधिक आहे. परंतु तरीही हा दर 4 वर्षांमधील सर्वात कमी विकासदर ठरणार आहे.

8 मूलभूत उद्योगांचा विकासदर

देशाच्या 8 मूलभूत उद्योगांचा विकासदर जानेवारीत वाढून 4.6 टक्के झाला आहे. तर मागील वर्षाच्या याच महिन्यात हे प्रमाण 4.2 टक्के राहिले होते. शुक्रवारी जारी अधिकृत आकडेवारीनुसार डिसेंबर 2024 मध्ये 8 मूलभूत उद्योगांचा विकासदर 4.8 टक्के होता. जानेवारीमध्ये कोळसा उत्पादन 4.6 टक्के इस्पात उत्पादन 3.7 टक्के आणि वीजनिर्मिती 1.3 टक्क्यांनी वाढली आहे. तर रिफायनरी उत्पादने, खते आणि सिमेंटचे उत्पादन वाढून अनुक्रमे 8.3 टक्के, 3 टक्के आणि 14.5 टक्क्यांनी वाढले आहे.

Comments are closed.