गलती से मिस्टेक… मुंबई विद्यापीठानं पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चंच स्पेलिंग चुकवलं, लाखो विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप

मुंबई विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्रामध्ये विद्यार्थ्यांची नावे चुकवल्याचे याआधी अनेकदा समोर आले आहे. मात्र यावेळी विद्यापीठाने चक्क स्वत:च्याच नावाचे स्पेलिंग चुकवले आहे. 2023-24 बॅचसाठी देण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठाने ‘मुंबई’चेच स्पेलिंग चुकीचे लिहिले आहे. पदवी प्रमाणपत्रच्या लोगोमध्ये 'अर्थ विद्यापीठ' असे लिहिण्यात आलेले आहे.

विशेष म्हणजे हे सर्व पदवी प्रमाणपत्र विद्यापीठीने सर्व महाविद्यालयांना पाठवली. हजारो, लाखो विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले. मात्र नोकरीच्या वेळी मुंबई विद्यापीठाने दिलेली प्रमाणपत्र बोगस ठरवली जातील की काय अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. स्पेलिंग चुकल्याचे लक्षात येताच महाविद्यालयांनी ही प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाला परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दीक्षांत सोहळ्यात वाटली प्रमाणपत्र

मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा 7 जानेवारी रोजी पार पडला. 2023-24 या शैक्षणिक वर्षात 1 लाख 64 हजार विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यापैकी किती विद्यार्थ्यांना स्पेलिंग चुकलेले प्रमाणपत्र मिळाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विद्यापीठाची लाज काढली

आपल्याच नावाचे स्पेलिंग चुकवणे ही मुंबई विद्यापीठासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी म्हटले. लोगोवरील नाव चुकल्याने हे प्रमाणपत्र बोगस वाटत आहे. नोकरी किंवा पदव्युत्तर शिक्षणावेळी ही प्रमाणपत्र बोगस ठरवली गेली तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय होणार? असा सवाल अन्य एका मुख्याध्यापकांनी उपस्थित केला.

Comments are closed.