Ambadas Danve’s counter attack on BJP regarding Himachal government
महायुती सरकारने ठेकेदारांचे पैसे दिलेले नाहीत, राज्यातील कामे कधीही ठप्प होऊ शकतात. लाडक्या बहिणींच्या संख्येत कपात केली आहे, योजनांचे पैसे कापले. शेतकऱ्यांची देणी दिली जात नाहीत.
(SS UBT Vs BJP) मुंबई : हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार आर्थिक अडचणीत आहे. योजना चालवण्यासाठी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील मोठ्या मंदिरांकडून पैसे मागितले आहेत. यासंदर्भात, हिमाचल प्रदेश सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या मंदिरांना पत्र लिहून दोन योजनांसाठी पैसे देण्याची विनंती केली आहे. तथापि, आता मंदिरांकडून पैसे मागितल्याबद्दल भाजपाने सुखू सरकारवर टीका केली आहे. तर, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, ‘तुमचे काय वेगळे आहे?’ असा प्रश्न करत भाजपावर पलटवार केला आहे. (Ambadas Danve’s counter attack on BJP regarding Himachal government)
हिमाचल प्रदेश सरकारच्या भाषा आणि संस्कृती विभागाने 29 जानेवारी रोजी मंदिर ट्रस्टला गरजू मुलांना मदत करण्याची विनंती केली होती. सरकारच्या आवाहनावरून, जिल्हाधिकाऱ्यांनी या आर्थिक मदतीसाठी मंदिर ट्रस्टला पत्रे जारी केली आहेत. मुख्यमंत्री सुखाश्रय आणि सुख शिक्षा योजनांसाठी सरकारच्या अखत्यारीतील मंदिरांचे ट्रस्ट मदत करतील, असे पत्रात लिहिले आहे. राज्यातील 35 मोठ्या मंदिरांची देखरेख जिल्हा प्रशासनाकडे असून या मंदिरांचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. तथापि, या योजनांना आर्थिक मदत देण्याचा अंतिम निर्णय या मंदिरांचे ट्रस्टच घेणार आहे.
तुमचं काय वेगळं आहे? ठेकेदारांचे पैसे दिलेले नाहीत. राज्यातील कामे कधीही ठप्प होऊ शकतात. लाडक्या बहिणींच्या संख्येत कपात केलीत. योजनांचे पैसे कापले. शेतकऱ्यांची देणी दिली जात नाहीत. एवढंच काय सरकारी दवाखान्यांत क्लिनिंग मशिन्स घेण्याला सरकारने नकार दिला आहे. राज्याचे कारभारी… https://t.co/BPb8fNeFzI
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 28, 2025
यासंदर्भात भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. विविध फुकट घोषणांमुळे भिकेला लागलेल्या हिमाचल प्रदेशातील कांग्रेस सरकारची नजर आता मंदिरांच्या दानपेट्यांकडे वळली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी विविध योजना आणि मुख्यमंत्री निधीसाठी मंदिरांनी भरभरून योगदान द्यावे, असा फतवा काढला आहे. हिंदू आणि सनातन धर्माचा द्वेष करणाऱ्या काँग्रेसला हिंदूंनी जाब विचारण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने याला प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही ‘X’वर शेअर केलेल्या पोस्टद्वारे पलटवार केला आहे. तुमचे काय वेगळे आहे? ठेकेदारांचे पैसे दिलेले नाहीत, राज्यातील कामे कधीही ठप्प होऊ शकतात. लाडक्या बहिणींच्या संख्येत कपात केली आहे, योजनांचे पैसे कापले. शेतकऱ्यांची देणी दिली जात नाहीत. सरकारी दवाखान्यांत क्लिनिंग मशिन्स घेण्याला सरकारने नकार दिला आहे. राज्याचे कारभारी मुंबई महापालिकेच्या ठेवींची करत असलेली ‘लांडगे तोड’ सगळा महाराष्ट्र बघत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Congress : विधानसभेत मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख तर, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील
Comments are closed.