Police arrest nephew of Shiv Sena Shinde faction district chief in molestation case against Union Minister of State for Sports Raksha Khadses daughter


जळगाव – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. सात जणांविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी अजून फरार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुखांच्या पुतण्यालाही अटक करण्यात आली आहे.

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची मुक्ताईनगरमधील कोथळी गावातील संत मुक्ताई जत्रेत छेडछाड काढण्यात आली. रविवारी ही घटना समोर आल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि मुलीचे आजोबा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आक्रमक झाले. घटनेला दोन दिवस झाले तरी आरोपींवर साधी कारवाई देखील करण्यात आली नाही, यामुळे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे संतप्त झाल्या. त्यांनी पोलिस ठाणे गाठत आरोपींवर कारवाईची मागणी केली.

आरोपी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी?

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड होते तरीही आरोपी मोकाट फिरत असल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनीही राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील लाडकी बहीण सुरक्षित नसल्याचाही आरोप विरोधकांकडून करण्यात आला. मुक्ताईनगरच्या या छेडछाडीच्या प्रकरणावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सात जणांविरोधात दोन गुन्हे दाखल केले. यातील चार आरोपींना आज (सोमवार) अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे. अनिकेत भोई हा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा कट्टर समर्थक आहे. तसेच रावेर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख छोटूभाई यांचा पुतण्या आहे.

यात्रेत नेमके काय घडले?

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसह यात्रेत गेली होती. यावेळी त्यांच्यासोबत अंगरक्षक पोलीस देखील होते. यात्रेत केंद्रीय मंत्री खडसे यांच्या मुलीसोबत गैरवर्तन करण्यात आले. त्यावेळी अंगरक्षक पोलिसांनाही गुंडांनी धक्काबुक्की केली. मुली जिथे जातील तिथे त्यांच्यामागे जात टवाळखोर त्यांची छेड काढत होते. याप्रकरणी पोलिसांना धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा मुलींची छेडछाड केल्याचा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. किरण माळी हा देखील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : Rohini Khadse : केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षीत नसेल तर…; महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खाते अपयशी



Source link

Comments are closed.