97व्या ‘ऑस्कर’ पुरस्कारामध्ये ‘अनोरा’ची बाजी, तब्बल पाच पुरस्कारांवर मोहोर

ब्रुकलीनमधील एका सेक्स वर्करचा परीकथेपर्यंतचा प्रवास मांडणाऱया ‘अनोरा’ने तब्बल पाच पुरस्कारांवर मोहोर उमटवत 97व्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये बाजी मारली आहे.
प्रिटी वुमन या गाजलेल्या हॉलीवूडपटाची आठवण करून देणारा ‘अनोरा’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तसेच या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट एडिटिंग आणि पटकथा असे तब्बल पाच पुरस्कार पटकावले. 97 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलीस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. कॉनन ओब्रायनने या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले होते.
नामांकनामध्ये ‘अनोरा’, ‘द ब्रुटलिस्ट’, ‘अ कम्प्लिट अननोन’, ‘कॉन्क्लेव्ह’, ‘डय़ून – पार्ट टू’, ‘एमिलिया पेरेझ’, ‘आय एम स्टिल हिअर’, ‘निकेल बॉईज’, ‘द सबस्टन्स’ आणि ‘विकेड’ हे चित्रपट होते. यातील ‘अनोरा’ या चित्रपटाने पाच पुरस्कार पटकावले आहेत.
‘द ब्रुटलिस्ट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी एड्रियन ब्रोडीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार आपल्या नावे केला आहे. ऑस्कर विजेता किलियन मर्फीच्या हस्ते एड्रियनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘द ब्रुटलिस्ट’ या चित्रपटाच्या डॅनिअल ब्लुमबर्गने बेस्ट ओरिजिनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार नावावर केला.
ब्राझिलच्या ‘आय अॅम म स्टिल हिअर’ या चित्रपटाने बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्मसाठी ऑस्कर पुरस्कार पटकावला. यंदाच्या पुरस्कारांमध्ये भारताच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीमध्ये हिंदुस्थानचा हिंदी लघुपट ‘अनुजा’ पराभूत झाला आहे. व्हिक्टोरिया वॉर्मरडॅमच्या ‘आय अॅम नॉट अ रोबोट’ने सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मचा ऑस्कर जिंकला आहे. ‘अनुजा’ची निर्मिती गुनित मोंगा, प्रियांका चोप्रा जोनास आणि मिंडी कलिंग यांनी केला होता.
Comments are closed.