क्रौर्याची परिसीमा, संतोष देशमुखांच्या मरणयातना पाहून महाराष्ट्र सुन्न! आरोपपत्रात व्हिडीओ अन् फोटोंचा समावेश

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगने दिलेल्या मरणयातना पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे वर्णन ऐकूनच आतापर्यंत अंगावर शहारा येत होता; पण प्रत्यक्ष देशमुखांनी काय भोगलेय हे पाहून ज्यांनी हे अमानुष, अमानवी कृत्य केले त्यांना फाशीशिवाय दुसरी कोणतीच शिक्षा असू शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटली आहे.

अवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीला विरोध केला म्हणून कराड गँगने सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले. संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवालातही या अमानुष मारहाणीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मारहाण करताना संतोष देशमुख विव्हळतानाचे व्हिडीओ काढून ते दहशत निर्माण करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल करण्यात आले. संतोष देशमुख यांच्या हत्येचा विकृत आनंद आरोपींनी घेतल्याचा उल्लेख एसआयटीने भरन्यायालयात केला होता. आज या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांना महेश केदार याच्या मोबाईलमध्ये मारहाणीचे 15 व्हिडीओ तसेच 8 फोटो सापडले. हे सर्व पुरावे म्हणून दोषारोपपत्रासोबत जोडण्यात आले आहेत.

संतोष देशमुख प्राणाची याचना करत असताना हे आरोपी त्यांच्या विव्हळण्याचा विकृत आनंद घेत होते. लोखंडी रॉडला करदोडे गुंडाळून त्याने मारहाण करण्यात आली. दोषारोपपत्रासोबत जोडण्यात आलेले व्हिडीओ, फोटोंनी संतोष देशमुखांच्या त्या शेवटच्या तीन तासांतील मरणयातनांचा प्रवास जगासमोर आणला आहे.

कृष्णा आंधळे कुणाच्या छत्रछायेखाली?

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. कर्नाटकात गेलेल्या उैसतोड टोळीबरोबर तो असल्याची माहिती होती, पण तो अजूनही सापडलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना राजकीय संरक्षण मिळाले होते. कृष्णा आंधळेही राजकीय कवचाखाली सुरक्षित असल्याची जोरदार चर्चा आहे.

विष्णू चाटेचा मोबाईल कुठे आहे?

संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे हे नाशिक जिल्हय़ात पळाले होते. तेथेच विष्णू चाटे याने आपला मोबाईल फेकून दिला. सीआयडी, एसआयटीने हा मोबाईल शोधण्यासाठी जंग जंग पछाडले, पण तो सापडला नाही. विष्णू चाटेच्या मोबाईलमध्येही मारहाणीचे व्हिडीओ असून त्याच्याच मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करून ‘आका’ला दाखवण्यात आले होते. चाटेच्याच मोबाईलवरून वाल्मीकने खंडणीसाठी अवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला धमकी दिली होती.

Comments are closed.