कायदा – सुव्यवस्थेचा मुडदा… महाराष्ट्रात खाकी वर्दीही सुरक्षित नाही; दरोडेखोरांचा पिंपरी – चिंचवडच्या पोलीस उपायुक्तांवर कोयत्याने हल्ला

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुडदा पडला असून खाकी वर्दीही सुरक्षित राहिलेली नाही. पुणे जिल्हय़ातील चाकणजवळच्या केंदूर घाटात दरोडेखोरांनी पोलीस अधिकाऱ्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱहाड हे जखमी झाले आहेत.

जखमी अवस्थेतही पोलीस उपायुक्तांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून दरोडेखोरांवर दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी लागून दरोडेखोर जायबंदी झाला. पोलिसांनी त्वरित त्याला जेरबंद केले. तर, जंगलात पळून गेलेल्या अल्पवयीन दरोडेखोराला पोलिसांनी शिताफीने पकडले. ही थरारक घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंचोशी येथे केंदूर घाटात रविवारी मध्यरात्री घडली. सचिन चंदर भोसले असे अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. तर, अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

शिवाजी पवार यांच्या छातीला पाच टाके पडले असून, जऱ्हाड यांच्या दंडाला मोठी जखम झाली आहे. दरोडेखोर सचिन याच्या उजव्या पायाला गोळी घासून गेल्याने तो जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला सुरुवातीला चाकण येथील एका रुग्णालयात नेले. तेथून त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले.

खेड तालुक्यातील बहुळ येथे 23 फेब्रुवारी रोजी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी चाकू आणि सुरीचा धाक दाखवत लुटमार केली होती. वृद्धाचा मुलगा आणि सुनेवर चाकूने हल्ला करून दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली होती. या घटनेतील दरोडेखोर चिंचोशी गावात आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. पवार सुट्टीवर असतानाही त्यांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पुढाकार घेतला.

केंदूर घाटातील मंदिरात दरोडेखोर दबा धरून बसले होते. पोलिसांनी दरोडेखोरांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, दरोडेखोरांनी शरण न येता पोलिसांवर हल्ला चढवला. सचिन याने पोलीस उपायुक्त पवार यांच्यावर कोयत्याने वार केला. हा वार त्यांच्या छातीवर बसला. सहायक निरीक्षक जऱ्हाड यांनी सचिनला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही त्याने वार केला. हा वार जऱहाड यांच्या डाव्या दंडावर बसला. हल्ल्यात पवार आणि जऱहाड जखमी झाले.

मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण, मिंधे गटाच्या चार टवाळखोरांना अटक

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात मिंधे गटाच्या सात टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिकेत भोई, किरण माळी, अनुज पाटील आणि एका अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे. उर्वरित तिघांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथडी येथे ग्रामदेवतेच्या यात्रेत हा प्रकार घडला होता. हे सर्व टवाळखोर मिंधे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत.

Comments are closed.