संशयित दहशतवादी गुजरात एटीएसने अटक केली

स्फोटके हस्तगत : अयोध्येशी कनेक्शन

वृत्तसंस्था/ फरिदाबाद

फरिदाबाद येथील एका गावात गुजरात एटीएसने संयुक्त कारवाईत एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. या संशयिताकडून स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. गुजरात एटीएसचे पथक पलवल एसटीएफसोबत मिळून त्याचा शोध घेत पाली या गावात पोहोचले होते. संबंधित आरोपी गावात नाव बदलून मागील 10 दिवसांपासून राहत होता. हा आरोपी उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील रहिवासी असल्याचे समजते. तो गुजरातमधून फरिदाबाद येथे येत नाव बदलून राहत होता. तो राहत असलेल्या ठिकाणी झडती घेण्यात आली असता स्फोटके सापडली आहेत. ही स्फोटके त्याने गुजरातमधून फरिदाबाद येथे आणल्याचा संशय आहे. यामागील त्याचा हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. संबंधित आरोपी विदेशातील काही लोकांच्या संपर्कात होता असे सूत्रांकडून समजते.

आरोपीकडे हँडग्रेनेड मिळाल्याने बॉम्बविरोधी पथक अन् श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. तर स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी अधिक माहिती देणे तूर्तास टाळले आहे.

Comments are closed.