वाइल्डलाइफ डे वर गिर मधील पंतप्रधान मोदी
वन्य सिंहांची फोटोग्राफी करण्याचा घेतला आनंद
वृत्तसंस्था / गांधीनगर
जागतिक वन्यजीवन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंहांचे अभयारण्य असणाऱ्या गीरचा दौरा केला आहे. हे अभयारण्य गुजरातमध्ये आहे. गीरच्या वनात आशियायी सिंहांची संख्या वाढत आहे, हे पर्यावरणाच्या दृष्टीने एक स्चिन्ह आहे, असे तज्ञांचे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या गीर भेटीत वन्य सिंहांची फोटोग्राफी करण्याचा आनंदही घेतला, अशी माहिती देण्यात आली.
गीरचे हे जगप्रसिद्ध सिंह अभयारण्य जुनागढ जिल्ह्यात आहे. भारतातील वन्यजीवनाचे संवर्धन आणि सुरक्षा करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे. केंद्राच्या या धोरणाला अनुसरुनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा गीर दौरा आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती केंद्र सरकारच्या वन्य विभागाने दिली आहे.
अनुभव केला प्रसारित
गीरच्या वनाचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले अनुभव देशवासीयांसाठी ‘एक्स’ वरुन प्रसारित केले. यासंबंधीच्या अनेक पोस्ट त्यांनी एक्सवर प्रसारित केल्या आहेत. रविवारी रात्री त्यांनी गीरमधील सिंह सदन या वास्तूत वास्तव्य केले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी काही तास वनातून फेरफटका मारला. त्यावेळी त्यांना अनेक सिंहांचे दर्शन घडले. आपल्याकडील कॅमेऱ्याने त्यांनी या सिंहांचे छायाचित्रण केले, तसेच व्हिडीओग्राफीही केली.
स्थानिकांचा सहभाग महत्वाचा
वन्यजीव संरक्षणात गीरच्या आसपार वास्तव्य करणाऱ्या वनवासी जमातींचा आणि अन्य स्थानिक नागरीकांचा महत्वाचा सहभाग आहे. सध्या मानव आणि वन्य जीव यांच्यात एक मोठा संघर्ष होत आहे. मानवाकडून झपाट्याने वन्यजीवांच्या आधिवासांवर अतिक्रमण केले जात असल्याने वन्यजीवही मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. त्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे. तथापि, गीरमध्ये स्थानिकांनी वन्य जीवांशी सहजीवन कसे शक्य होते, याचा वस्तूपाठच घालून दिला आहे, अशा अर्थाचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यानंतर केले.
Comments are closed.