नामदेव ढसाळ कोण… सेन्सॉर बोर्डाच्या मुंबईतील कार्यालयावर शिवसैनिक धडकले, माफी न मागितल्यास शिवसेना स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा

‘नामदेव ढसाळ कोण?’ असा प्रश्न विचारून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करणाऱया सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱयांनी अद्याप याप्रकरणी माफी मागितलेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी सोमवारी सेन्सॉर बोर्डाच्या मुंबईतील कार्यालयावर धडक दिली. सेन्सॉर बोर्डाने माफी न मागितल्यास शिवसेना स्टाइलने धडा शिकवू, असा इशारा शिवसेनेने सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱयांना दिला आहे.

दलित पँथर चळवळीचे प्रणेते आणि सुप्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांचे साहित्य महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या लेखनाचा गौरव केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ने केला आहे. असे असताना दलित पँथर आणि युवा क्रांती दल यांच्यातील चळवळीवर बेतलेल्या ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱयांनी ‘नामदेव ढसाळ कोण?’ असा प्रश्न उपस्थित केला तसेच या चित्रपटात शिवराळ भाषा, अश्लील कविता असल्याचे सांगत आक्षेप घेतला आहे. त्यामुळे दलित चळवळीतील कार्यकर्ते व महाराष्ट्रातील जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी सोमवारी सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयावर धडक दिली; परंतु तो अधिकारी उपस्थित नसल्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या इतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ‘पद्मश्री’नामदेव ढसाळ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सेन्सॉर बोर्डाने लेखी माफी मागावी; अन्यथा शिवसेना स्टाइल धडा शिकवू, असा इशारा शिवसेना पक्षसंघटक विलास रूपवते यांनी दिला.

सेन्सॉर बोर्ड तत्काळ बरखास्त करा…

दलित पँथर आणि लोकांचा सिनेमा चळवळ या संघटनेच्या वतीने सोमवारी दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर सेन्सॉर बोर्डाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. नामदेव ढसाळ कोण, असा प्रश्न विचारणारे सेन्सॉर बोर्ड तत्काळ बरखास्त करा, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. सेन्सॉर बोर्डाची गरजच काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे करायचे काय, अशा घोषणा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या.

Comments are closed.