Ratnagiri woman rally against micro finance companies


मुंबई : मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांचे प्रचंड आर्थिक शोषण होत आहे. परिणामी संबंधित महिलांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे वसूली एजंटांच्या जाचामुळे यापैकी एका महिलेने आपले जीवन संपवले आहे. कंपन्यांची ही दादागिरी संपुष्टात आणण्यासाठी सरकारने वेळीच हस्तक्षेप न केल्यास हप्ताबंद आंदोलन सुरू करण्याबरोबर रत्नागिरी ते मंत्रालय असा महिलांचा लाँगमार्च काढण्यात येईल. तसेच या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सध्या सुरू झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात लक्ष्यवेधी तसेच तारांकित प्रश्नाद्वारे महिलांच्या अन्यायाला वाचा फोडण्यात येणार आहे, असा निर्धार महिलांच्या एल्गार मेळाव्यात करण्यात आला. जनता दल सेक्युलर आणि कोकण जनविकास समितीने मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीविरोधात रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात एल्गार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात यापुढे कोणताही अन्याय सहन करणार नसल्याचे महिलांनी दाखवून दिले. (Ratnagiri woman rally against micro finance companies)

हेही वाचा : IND VS AUS : भारताचा पराभव होणार? दुबईत 250+ धावांचा फक्त तीनदा पाठलाग 

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या भरमसाठ चक्रव्याढ व्याजामुळे महिलांना जीवन नकोसे झाले आहे. अनेक महिलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. काही हजारांचे कर्ज दोन एक वर्षे व्याज भरूनही लाखांच्या घरात गेल्याने आता जगायचे कसे? असा आक्रोश करत काही प्रातिनिधिक महिलांनी मेळाव्यात आपल्या व्यथा मांडल्या. दागिने, जमिनी, बागा विकून कर्ज फिटत नसल्याने यापुढे आमचा संसाराचा गाडा चालवायचा तरी कसा असा जीवघेणा प्रश्न उपस्थित केला गेला. रात्री अपरात्री घरात घुसून व्याज वसूल करणाऱ्या एजंटांनी नियम, कायदे धाब्यावर बसवल्याची उदाहरणे महिलांनी दिली. “मायक्रो फायनान्स कंपन्या रत्नागिरी जिल्ह्यातील कर्जदार महिलांकडून पठाणी दराने व्याज वसूल करत आहेत. यामुळे संबंधित महिला आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रचंड आर्थिक शोषण होत आहे. यातून महिलांची सुटका करण्यासाठी आता सरकारने पुढाकार घ्यायला हवा. यासाठी उर्वरित कर्जाची वसुली करण्यास मनाई करण्यात यावी. मुख्य म्हणजे कर्ज मंजूर करण्यासाठी केलेला करारनामा व अन्य कागदपत्रांच्या प्रती संबंधित महालाला मिळाव्यात आणि कर्जाच्या रकमेतून केलेली १० टक्के कपात रद्द करून सदर रक्कम महिलांना परत करावी” अशी आग्रही मागणी मेळाव्याचे प्रमुख आयोजक आणि जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी यावेळी मेळाव्यात केली.

“महिलांच्या आर्थिक निरीक्षरतेचा फायदा उठवत आणि रिझर्व्ह बँकेचे नियम धाब्यावर बसवत रत्नागिरी जिल्ह्यात दहाहून अधिक मायक्रो फायनान्स कंपन्यांनी मनमानीपणे कर्जवाटप केले आहे. या दडपशाहीला चाप बसण्याची गरज असून कर्नाटक सरकारने मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचाला आळा घालण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने कर्जदारांना संरक्षण देणारा सर्वकश कायदा करावा. खाजगी सावकारांना कमाल वार्षिक 18 टक्के व्याजदराची मर्यादा सरकारने घालून दिली आहे. तीच मर्यादा मायक्रो फायनान्स कंपन्यांना लागू करण्याचा आग्रह रिझर्व्ह बँकेकडे करण्यात यावा” अशा प्रमुख मुद्द्यांकडे प्रभाकर नारकर यांनी फडणवीस सरकारचे लक्ष वेधले आहे. या मेळाव्याला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नम्रता जाधव, जनता दल मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष संजीवकुमार सदानंद, कोकण जनविकास समितीचे प्रमुख संघटक जगदीश नलावडे, सामाजिक संघटक संग्राम पेटकर, जनता दल जिल्हाध्यक्ष युयूत्सु आर्ते यांनी मार्गदर्शन केले. तर ज्येष्ठ पत्रकार संजय परब यांनी मेळावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



Source link

Comments are closed.