हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत
अखेर हिंदुस्थानने चॅम्पियन्सच्या मार्गावर धाव घेताना ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत 4 विकेट्सने काटा काढला. सोबत 2023 च्या वर्ल्ड कप अंतिम सामन्यातील पराभवाचा बदलाही घेत सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता हिंदुस्थानला आयसीसीचे चॅम्पियन्स होण्यासाठी न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजयी संघाचा येत्या रविवारी पराभव करावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे 264 धावांचे आव्हान हिंदुस्थानने विराट कोहलीच्या 84 धावांच्या संयमी आणि जबाबदारीने केलेल्या खेळीच्या जोरावर 11 चेंडू आधीच पार पाडले. पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी ठोकणाऱ्या विराटने रोहित शर्मा (28) आणि शुभमन गिल (8) हे दोन्ही सलामीवीर पन्नाशीतच कॅव्हेलियनमध्ये परतल्यावर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि केएल राहुलसोबत 182 धावांची भर घालत त्याने हिंदुस्थानला विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचवले. विराटला 52व्या शतकाची संधी होती, पण 98 चेंडूंत केवळ 5 चौकारांसह त्याने 84 धावांची धीरोदात्त मॅचविनर खेळी केली. हिंदुस्थान विजयापासून 40 धावा दूर असताना तो बाद झाला आणि त्यानंतर राहुलने नाबाद 42 धावा करताना विजयी षटकारासह हिंदुस्थानच्या अंतिम फेरी प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
हिंदुस्थान सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2013 च्या स्पर्धेत हिंदुस्थानने इंग्लंडला हरवत आयसीसी चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवला होता. मात्र 2017 च्या स्पर्धेत अंतिम सामन्यात पाकिस्तानने हिंदुस्थानचा पराभव करत बाजी मारली होती. आता पुन्हा एकदा हिंदुस्थान चॅम्पियन्सच्या लढतीत भिडण्यासाठी सज्ज झाला आहे.
14 वर्षे आणि 14 महिने
इतिहास साक्ष आहे, हिंदुस्थानने जेव्हा जेव्हा बाद फेरी किंवा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्यात यश मिळवलेय तेव्हा हिंदुस्थानच जगज्जेता ठरला आहे. 2011 च्या विश्वचषकात हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला उपांत्यपूर्व फेरीत नमवले. मग जगज्जेता हिंदुस्थानच ठरला होता. मग 2007 आणि 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीतच पराभव केला. या दोन्ही स्पर्धांचा निकाल हिंदुस्थान जगज्जेता असाच होता. मात्र 14 महिन्यांपूर्वी झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत आपण ऑस्ट्रेलियाशी भिडलो होतो आणि हरलोही होतो. मात्र आता त्यांना उपांत्य फेरीत हरवले आहे. म्हणजे जे 14 वर्षांपूर्वी घडले होते त्याची यंदा पुनरावृत्ती होणार असे इतिहासाचेच संकेत आहेत.
स्मिथ, कॅरीची अर्धशतके
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि फलंदाजी स्वीकारली. मोहम्मद शमीने आपल्या लौकिकास साजेशी भन्नाट सुरुवात करत आपल्या दुसऱ्याच षटकात नवोदित सलामीवीर कूपर कोनोलीला शून्यावरच बाद केले. मात्र त्यानंतर ट्रव्हिस हेडने आक्रमक खेळ करताना कर्णधार स्टीव्ह स्मिथसह 50 धावांची भागी रचत 39 धावा ठोकल्या. त्यानंतर स्मिथने मार्नस लाबुशन (29), जॉश इंगलिस (11) आणि अॅलेक्स कॅरीसोबत (61) महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या करत संघाला द्विशतकासमीप नेले. स्मिथने हिंदुस्थानच्या प्रभावी माऱ्याला सावधपणे सामना करत ऑस्ट्रेलियाचा धावफलक हलता ठेवला. स्मिथची (73) वन डेतील 34 वी अर्धशतकी खेळी मोहम्मद शमीने त्रिफळाचीत केली. त्यानंतर सारी जबाबदारी अॅलेक्स कॅरीच्या खांद्यावर पडली. कॅरीने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला, पण हिंदुस्थानी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला फार वळवळू दिले नाही आणि त्यांना 264 धावांवर रोखले. कॅरीने 57 चेंडूंत 61 धावा फटकावत आपली कामगिरी चोख बजावली. गेल्या दोन्ही सामन्यांत एकही विकेट घेऊ न शकलेल्या शमीने आज 3 विकेट टिपले. तसेच वरुण चक्रवर्थी, अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियन धावसंख्येच्या निम्म्या धावा (132) देत निम्मा संघही गारद केला. कुलदीप यादवला एकही विकेट टिपता आला नाही.
पॅडींना वाहिली श्रद्धांजली
जादुई कामगिरीनंतरही हिंदुस्थानी संघात एकदाही संधी न लाभलेल्या मुंबईचे महान रणजीपटू पद्माकर शिवलकर यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात हिंदुस्थानी संघाने आपल्या दंडावर काळी पट्टी बांधून श्रद्धांजली वाहिली. बीसीसीआयने सामन्यापूर्वी याबाबत ट्विट करत जाहीर केले होते.
हिंदुस्थानची सलग चौदाव्यांदा नाणेफेक माला
हिंदुस्थान आजच टॉस हरला नाही, तर गेल्या 14 सामन्यांत हरण्याचे सातत्य कायम राहिले आहे. एकदिवसीय सामन्यात 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापासून सुरू झालेला नाणेफेक गमावण्याचा प्रकार गेले 14 महिने आणि 14 सामने कायम आहे. फक्त समाधानाची बाब एकच आहे की, 14 पैकी 9 सामन्यांत हिंदुस्थान जिंकलाय, तर 4 सामन्यांत पराभवाची झळ सोसावी लागलीय आणि एक सामना बरोबरीत सुटला होता.
क्षेत्ररक्षक कोहली दुसऱ्या स्थानावर
दोन सामन्यांपूर्वी मोहम्मद अझरुद्दीनच्या 156 झेलांच्या विक्रमाला मागे टाकत विराट कोहलीने क्षेत्ररक्षणात सर्वाधिक झेल टिपणारा हिंदुस्थानी खेळाडू म्हणून आपले नाव अव्वल स्थानावर नेलेच होते. त्यातच आज त्याने जॉश इंगलिस आणि नॅथन एलिसचे झेल टिपत रिकी पॉण्टिंगच्या 160 झेलांची बरोबरी साधत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल टिपणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत दुसरे स्थान संपादले. पॉण्टिंगने 375 सामन्यांत 160 झेल टिपले होते, तर विराटने 301 व्या सामन्यातच त्याची बरोबरी साधली. आता महेला जयवर्धनेच 218 झेलांसह गेली दहा वर्षे अव्वल स्थानावर कायम आहे.
Comments are closed.