मुंडेंच्या राजीनाम्यावरून लक्ष उडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा विधिमंडळात अभूतपूर्व गोंधळ, दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून लक्ष हटवण्यासाठी सत्ताधारी आमदारांनीच आज औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमींच्या निलंबनाच्या मागणीवरून विधिमंडळात अभूतपूर्व गोंधळ घातला. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी करताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या बेशिस्तीचे दर्शन घडवले. परिणामी कामकाज करणे शक्य नसल्याने दोन्ही सभागृहे आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोमवारी विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना औरंगजेबाचे उदात्तीकरण केले होते. औरंगजेब क्रूर नव्हता. तो महान राजा होता असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरल्याने उडालेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभर तहकूब करावे लागले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप आमदार महेश लांडगे यांनी अबू आझमींच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. अशा प्रवृत्ती रस्त्यावर ठेचल्या पाहिजेत, सभागृहात घेता कामा नये अशी मागणी केली, तर अबू आझमी हे 1992 च्या स्फोटातील एक आरोपी होते, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणाऱया औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱया आझमींवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा आणि अधिवेशन काळापुरते त्यांना निलंबित करावे अशी मागणी अतुल भातखळकर, उदय सामंत यांनी केली.

अबू आझमी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

औरंगजेबाच्या काळात हिंदुस्थानला ‘सोने की चिडीया’ म्हटले जायचे, अशा शब्दात औरंगजेबावर स्तुतिसुमने उधळणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू असिम आझमी यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा – अंबादास दानवे

विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. छत्रपतींचा अवमान करणाऱयांवर कारवाई करा. अबू आझमी यांनी औरंगजेब याचे उदात्तीकरण होईल असे वक्तव्य केले. प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आहे. राहुल सोलापूरकर यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा विकृतपणे इतिहास मांडला असल्याने या तिघांवर एकत्र कारवाई करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

विधानसभा अध्यक्षांची विनंतीही धुडकावली

तुमच्या भावना गंभीर आहेत, पण अशा पद्धतीने कामकाज चालू शकत नाही. जागेवर जाऊन बसा, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सत्ताधाऱयांना करीत होते. पण सत्ताधारी आमदार त्यांच्या विनंतीलाही जुमानत नव्हते. सत्ताधाऱयांच्या गोंधळामुळे सुरुवातीला दहा मिनिटे, मग तीस मिनिटे आणि मग पंधरा मिनिटे कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतरही सत्ताधारी आमदार पुन्हा अध्यक्षांसमोरील मोकळय़ा जागेत गोंधळ घालू लागले. अखेर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

हिंमत असेल तर आझमींना निलंबित करा – भास्कर जाधव

सत्ताधाऱयांच्या घोषणाबाजीवर शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. 17 व्या शतकातला विषय आहे. त्याचे उदात्तीकरण होतेय. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, मग तुमच्यात हिंमत असेल तर आझमींना निलंबित करा, असे जाधव म्हणाले.

Comments are closed.