मी तुझ्या वडिलांची निर्मिती केली!
नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांना खडसावले, बिहार विधानसभेत प्रचंड खडाजंगी
वृत्तसंस्था / पाटणा
बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री नितीशकुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यात प्रचंड शाब्दीक संग्राम झडला आहे. राज्यातील पायाभूत सुविधांच्या स्थितीसंबंधी चर्चा होत असताना हे शब्दयुद्ध भडकले. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना मीच घडविले आहे. तथापि, नंतर त्यांनी स्वत:ची काय अवस्था करुन घेतली, हे साऱ्यांना माहीत आहे, अशा अर्थाचे वक्तव्य मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांना उद्देशून केले. त्याआधी तेजस्वी यादव यांनी अनेक आरोप राज्यसरकारवर केले होते.
नितीश कुमार विधानसभेत भाषण करीत असताना तेजस्वी यादव त्यांच्या भाषणात सारखा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी नितीशकुमार यांनी यादव यांना धारदार प्रत्युत्तर दिले. लालू प्रसाद यादव यांच्या राज्यात बिहारची काय दैन्यावस्था होती, हे साऱ्यांना माहिती आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर खरी प्रगती झाली. महादलित, अतिमागसवर्गीय आणि दलितांना खरा न्याय मिळाला. म्हणून लोकांनी वारंवार आमचे सरकार निवडून दिले आहे. लालू यादव यांच्या कारभाराला जनता कंटाळली होती. ते असे का करीत आहेत, असा प्रश्न तुमच्या समाजातील लोक आम्हाला विचारत होते, हे लक्षात घ्या, असा टोला नितीशकुमार यांनी लगावला.
समाजात होती अस्वस्थता
लालू प्रसाद यादव यांच्या राज्यात मोठी सामाजिक अस्वस्थता होती. अनेक समाजघटक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. राज्यात हिंसाचार, गुन्हेगारी आणि आर्थिक गैरव्यवहारांची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर घडत होती. सर्वसामान्य आणि गरीब यांना कोणी संरक्षण उरला नव्हता, अशा स्थितीत आम्ही बिहार सावरला आणि नंतर तो घडविला, असा घणाघात नितीश कुमार यांनी केला.
तेजस्वी यादव यांची टीका
नितीश कुमार यांच्या भाषणापूर्वी तेजस्वी यादव यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर, त्यांच्या भाषणात टीका केली. 2005 पूर्वी बिहारमध्ये सारे काही वाईट घडत होते, असा आरोप केला जातो. 2005 नंतरच जणू बिहारची निर्मिती झाली, असाही टेंभा मिरविला जातो. तथापि, आम्ही खरा इतिहास जनतेसमोर मांडला पाहिजे. या सभागृहातील अनेकांना तो माहीत आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनाही तो ज्ञात आहे, असे टोमणे त्यांनी मारले.
3.17 लाख कोटींचा अर्थसंकल्प
सोमवारी बिहार विधानसभेत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी 3.17 लाख कोटी रुपये आकाराचा अर्थसंकल्प सादर केला होता. तो गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा 13.6 प्रतिशत मोठा आहे. या अर्थसंकल्पावर सध्या बिहार विधानसभेत चर्चा होत आहे. राज्यातील पात्र महिलांना प्रतिमहिना 2,500 रुपये दिले जावेत अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केली होती. तथापि, अर्थसंकल्पात ही योजना घोषित करण्यात आली नाही, अशी टीका त्यांनी केली. तथापि, नितीशकुमार यांनी प्रत्युत्तर देताना महिलांच्या लाभासाठी यापूर्वीपासूनच अनेक योजना लागू असल्याचे आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे.
Comments are closed.