औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे अबू आझमी निलंबित

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय विधानसभेत घेण्यात आला. अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधान भवन आवारात येण्याचीदेखील बंदी घालण्यात आली आहे.

अबू आझमी यांनी विधान भवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना औरंगजेबाचे उदात्तीकरण केले होते. मंगळवारी याच मुद्दय़ावरून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला होता.

आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. अबू आझमींचे वक्तव्य अतिशय गंभीर आहे. त्यांचे सदस्यत्व अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे तसेच त्यांना या कालावधीत विधान भवन आवारात प्रवेशबंदी करण्यात यावी असा हा प्रस्ताव होता. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी जुने दाखले देत केवळ अधिवेशन संपेपर्यंत निलंबन न करता त्यांचे सदस्यत्व निलंबित करावे अशी मागणी केली. यासाठी आमदारांची समिती नेमा तोपर्यंत त्यांचे सदस्यत्व निलंबित करा असे मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, औरंगजेबाचे समर्थन कोणी करू शकत नाही. तो नालायकच होता. मुस्लिम लोकांमध्येही कोणी मुलांचे नाव औरंगजेब ठेवत नाही याकडे लक्ष वेधले.

तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपचे 12 सदस्य निलंबित झाले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते तेव्हा न्यायालयाने निलंबन एका अधिवेशनापुरतेच करता येऊ शकते असा निर्णय दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मतास टाकला. बहुमताने हा प्रस्ताव संमत झाल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार आक्रमक झाले होते. त्यांनी अध्यक्षांसमोरील जागेत येऊन आझमींच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. महाविकास आघाडीच्या सदस्यांनीही अबू आझमींच्या विरोधात घोषणा दिल्या.

Comments are closed.