भारत आणि चीनवर कर देखील लागू केला जाईल.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची प्रतिनिधीगृहात घोषणा

नवी दिल्ली

पुढील महिन्यापासून भारत, चीन आणि इतर देशांच्या मालावर प्रचंड कर लागू करण्यात येतील, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहासमोर भाषण करताना केली आहे. भारत, दक्षिण कोरिया आणि जपान यांसारख्या देशांवर रेसिप्रोकल कर लागू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बाहेरच्या देशांमधून जो माल अमेरिकेत आयात केला जातो, तो घृणित आणि घाणेरडा असतो, असेही विधान त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि भारतासारख्या देशांच्या अमेरिकेसंबंधी असणाऱ्या व्यापार व्यवहारांवर कठोर टीका केली. या देशांनी आजवर अमेरिकेच्या उदार धोरणांचा मोठा लाभ उठविला आहे. अमेरिकन मालाच्या आयातीवर हे देश प्रचंड कर लावतात. त्यामुळे या देशांना अमेरिका अधिक माल निर्यात करू शकत नाही. अमेरिका मात्र या देशांच्या मालावर कमी कर लावते. त्यामुळे अमेरिकेच्या बाजारात या देशांचा माल मोठ्या प्रमाणावर येतो. यामुळे अमेरिकेला व्यापारी तूट सहन करावी लागते. आता ही परिस्थिती आपण सुधारणार आहोत. हे देश अमेरिकेच्या मालावर जितका कर लावतील तितकाच आम्ही त्यांच्या मालावर लावू, असे वक्तव्य त्यांनी लोकप्रतिनिधींसमोर केल्याने जगात हालचाल वेगवान झाली आहे.

त्यांच्याच भाषेत उत्तर देणार

इतके दिवस या देशांनी आमच्या उदारपणाचा लाभ घेतला. आता आमची वेळ आहे. आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देणार आहोत. अमेरिकेची नवी नीती 2 एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. नवे धोरण अमेरिकेचे उत्पादक, अमेरिकेचे व्यापारी आणि अमेरिकेचे ग्राहक यांना बलवान करण्यासाठी आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था भक्कम करण्याचा आपला निर्धार आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

तणाव निर्माण होणे शक्य

ट्रम्प यांच्या या नव्या धोरणामुळे अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या अनेक देश आणि अमेरिका यांच्यात मोठा व्यापारी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही नवी नीती एका जागतिक व्यापारयुद्धाला आमंत्रण देणारी ठरेल, असा इशारा अनेक जागतिक तज्ञांनी आणि अभ्यासकांनी दिला आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळ्या आणि जागतिक बाजारांमध्ये मोठी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जग या धोरणांकडे अत्यंत सावधतेने पाहत आहे.

भारतावर काय परिणाम?

ट्रम्प यांच्या या नीतीचा भारतावर किती परिणाम होईल याविषयी उलटसुलट मते व्यक्त केली जात आहेत. भारत अमेरिकेला पोलाद, पोलादी वस्तू, औषधे, माहिती तंत्रज्ञान सेवा इत्यादींची निर्यात करीत असतो. त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, काही तज्ञांच्या मते भारताशी अमेरिकेचा व्यापार फार मोठा नाही. तसेच भारताची स्थानिक बाजारपेठ भक्कम असल्याने भारतावर याचा मोठा परिणाम होणार नाही. नेमका कोणता परिणाम होतो, हे धोरणे लागू झाल्यानंतरच अधिक स्पष्टपणे समोर येईल अशी शक्यता आहे.

भारताची प्रतिक्रिया काय असेल ?

भारतावर प्रतिद्वंद्वी कर (रेसिप्रोकल टॅक्स) लागू करणार अशी घोषणा ट्रम्प यांनी अनेकदा केली आहे. भारताने अद्याप त्यांच्या या धोरणावर अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तथापि, अमेरिकेच्या नीतीमुळे दोन्ही देशांमधील पारंपरिक संबंधांना नवे वळण लागू शकते. अमेरिकेच्या धोरणाला कसे प्रत्युत्तर द्यायचे, यावर आता भारताला निश्चित नीती निर्धारित करावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर अनेकदा अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी करविषयक चर्चा केली आहे. ट्रम्प यांनी भारताच्या व्यापार नीतीवर अनेकदा टीका केली असून ती अनुचित असल्याचे प्रतिपादन केले आहे. ट्रम्प यांच्या प्रथम कार्यकाळातही त्यांनी भारताच्या मालावर मोठे कर लावले होते आणि भारतानेही तसेच प्रत्युत्तर दिले होते. यावेळी भारत आपल्या करधोरणात परिवर्तन करणार, की अमेरिकेच्या मालावर तसेच कर लावणार, हे लवकरच स्पष्ट होईल असे तज्ञांचे अनुमान आहे. एकंदर, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहासमोर केलेल्या भाषणामुळे जग सावध झाले आहे. भारतानाही वेळ न गमावता धोरण निश्चित करावे लागेल, अशी स्थिती आहे.

अमेरिकेला चीनचे प्रतिआव्हान

अमेरिकेला व्यापारयुद्धच हवे असेल, तर आम्हीही ते अखेरपर्यंत करण्यास सज्ज आहोत, असे प्रत्युत्तर चीनने दिले आहे. अमेरिकेच्या धोरणांशी आम्ही संघर्ष करणार आहोत. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात खपणारा अमली पदार्थ फेंटानीलच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारी रासायनिक द्रव्ये चीनकडून अमेरिकेला निर्यात होतात, ही ट्रम्प यांची समजूत काल्पनिक आहे. अमेरिका आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न करीत असेल, तर तो अपयशी ठरेल. आम्ही कोणाच्याही दबावात येणार नाही. आमचे हात आम्ही पिरगाळून घेणार नाही, असेही चीनने स्पष्ट केले आहे.

कॅनडाचे जशास तसे उत्तर

अमेरिकेने करांमध्ये वाढ केल्यानंतर कॅनडानेही जशास तसे उत्तर दिले आहे. अमेरिकेतून कॅनडात निर्यात होणाऱ्या मालावरील कर या देशाने वाढविला आहे. तसेच अमेरिकेचा वीजपुरवठा तोडला जाईल, असा इशाराही दिला आहे. या सर्व धोरणांमुळे या दोन्ही शेजारी देशांमध्ये प्रथम व्यापार युद्ध भडकले आहे.

ट्रम्प यांच्या विधानांमुळे खळबळ…

अमेरिकेचा अनुचित लाभ घेतल्याचा ट्रम्प यांचा अनेक देशांवर आरोप

ट्रम्प यांची नीती जगात व्यापारयुद्ध निर्माण करणार : तज्ञांचा अभिप्राय

भारतालाही आता आपले धोरण निर्धारित करावे लागणार हे निश्चित

Comments are closed.