हितेश मेहताची लाय डिटेक्टर चाचणी होणार, 11 मार्च रोजी खऱ्या-खोट्याचा होणार पर्दाफाश

न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि बँकेचा माजी जनरल मॅनेजर हितेश मेहता याची आता लाय डिटेक्टर चाचणी होणार आहे. त्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली असून 11 मार्च रोजी ही चाचणी करण्यात येणार आहे. त्या दिवशी मेहता चौकशीदरम्यान देत असलेली माहिती खरी किती आणि खोटी किती याचा पर्दाफाश होणार आहे.

न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने माजी जनरल मॅनेजर हितेश मेहता बेडय़ा ठोकल्या आहेत. त्याने चौकशीत बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला 40 कोटी तर सोलार पॅनल व्यावसायिक अरुण चिलम याला 40 कोटी दिल्याचे सांगितले. पण ऐवढे पैसे मेहताने मला दिलेच नाही असे पौनचे म्हणणे असून उलट मीच मेहताला कर्ज दिले असे अरुणचिलमचा मुलगा मनोहर सांगत आहे. त्यामुळे मेहता सांगतोय ते खरे आहे की तो गंडवतोय यांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस मेहताची लाय डिटेक्टर चाचणी करणार आहे.

फरार भानू दाम्पत्याच्या घरांची झडती

न्यू इंडिया बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि त्याची पत्नी गौरी भानू या दाम्पत्याला पोलिसांनी या प्रकरणात आरोपी दाखवले आहे. दोघेही एनआरआय असून ते हे प्रकरण उघडकीस येण्याआधीच दुबईत जाऊन बसलेत. पोलिसांनी त्यांच्या मलबार हिल आणि नेपयन्सी रोड येथील दोन घरांची झाडाझडती घेतली.

बँकेला कॅश इन हॅण्ड ठेवण्यासाठी 20 कोटी रुपयांची मर्यादा होती, पण बँकेकडे वर्ष 2019 मध्ये 31 कोटी, 2020 मध्ये 99 कोटी, 2021 मध्ये 94 कोटी, 2022 मध्ये 105 कोटी, 2023 मध्ये 122 कोटी, 2024 मध्ये 135 कोटी बँकेत असल्याचे ऑडिट रिपोर्टमध्ये आढळून येत आहे. असे जर होते तर आरबीआयने त्या त्या वेळेस तपासणी का केली नाही, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Comments are closed.