Nitesh Rane vs Rohit Pawar on Koratkar and Solapurkar Statements
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून अनेक घडामोडी घडल्या. राज्यात अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दला केलेल्या विधानाने राज्यात गदारोळ झाला. त्यानंतर नागपूरमधील कथित पत्रकार प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपमानजनक शब्दांचा वापर केल्याचे समोर आले आणि महाराष्ट्रात राज्य सरकारवर कारवाई होत नसल्याचे टीका करण्यात आली. याचे पडसाद सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही दिसून येत आहेत. याच मुद्यावरून बुधवारी (5 मार्च) विधानसभेत मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. (Nitesh Rane vs Rohit Pawar on Koratkar and Solapurkar Statements)
काय म्हणाले रोहित पवार?
बुधवारी विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात अली. या चर्चेत सहभागी होताना रोहित पवार म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा कोरटकर एवढा मोठा कधी झाला? सरकार त्याच्या घराला सुरक्षा देते आणि त्या सुरक्षेतून तो मध्य प्रदेशात पळून जातो. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे, इथेही भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्या कोरटकरला का पकडत नाही? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.” असे म्हणत त्यांनी निशाणा साधला. तसेच ते पुढे म्हणाले की, “राहुल सोलापूरकरवरही सरकारने कारवाई केली नाही. याउलट पुणे महापालिकेत पदावर घेऊन बक्षीस दिले. सीबीआय, ईडीने मोतेवार यांच्या जप्त केलेल्या गाड्या कोरटकर वापरतो. यावर आता सीबीआयने कारवाई केली. दिल्लीमध्ये बसून सीबीआय कारवाई करते. पण, आपले सरकार कारवाई करत नाही,” अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.
मंत्री नितेश राणेंचा पवारांवर हल्लाबोल
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला. “सदर प्रकरणी राज्य सरकारकडून कोरटकर आणि सोलापूरकर या दोघांवरही कारवाई सुरू आहे. आमदार रोहित पवार हे सभागृहात चुकीची माहिती देत आहेत,” असे त्यांनी सांगितले. “महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोण म्हणाले होते? हे आपल्या आजोबांना जाऊन विचारा. औरंग्या होता म्हणून शिवाजी महाराज झाले असे जितेंद्र आव्हाड बोलतात. हे आम्हाला शिकवणार? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना आमचे सरकार सोडणार नाही,” असे म्हणत प्रत्त्युत्तर दिले.
शाब्दिक बाचाबाची
यावेळी आमदार रोहित पवार आणि मंत्री नितेश राणे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नितेश राणे यांच्या बाजूने सत्ताधारी सदस्य तसेच रोहित पवार यांच्या बाजूने विरोधी सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत उतरले. तसेच, “यावेळी सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ घालून कोरटकरच्या मुद्द्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, आम्हाला या विषयापासून दूर जायचे नाही. कोरटकर, सोलापूरकर वर कारवाई झालीच पाहिजे,” असे म्हणत रोहित पवार यांनी निशाणा साधला. तसेच, “मी तुमच्या घरापर्यंत जात नाही. त्यामुळे माझ्या आजोबांबद्दल काय बोलत आहात? अशा शब्दात निलेश राणे यांना ठणकावले.
Comments are closed.