मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या औरंगजेबांना तुम्ही काय शिक्षा देणार? भैयाजी जोशींवरून संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

मुंबईची भाषा मराठी नाही, त्यामुळे इथे येण्यासाठी मराठी आलंच पाहिजे असं काही नाही असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी केला होते. त्यावर भैयाजी जोशी यांचे विधान औरंगजेबापेक्षा भयंकर अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच भैयाजी जोशी यांचा महायुती सरकारने विधीमंडळात निषेध करावा असेही संजय राऊत म्हणाले.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भैयाजी जोशी लखनौमध्ये जाऊ म्हणू शकतात का की लखनौची भाषा हिंदी नाही. कोलकात्यात जाऊन म्हणू शकता का कोलकात्याची भाषा बंगाली नाही. पण महाराष्ट्रात राजधानीत येऊन ते सांगतात की या मुंबईची भाषा मराठी नाही आणि मराठी येण्याची गरज नाही. मराठी ही राजभाषा आहे. आणि मराठी ही राजभाषा असेल तर अशा प्रकारे वक्तव्य हे राजद्रोहात बसतं. 106 हुतात्मे यांनी मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी बलिदान दिलं ते हे ऐकण्यासाठी?

तसेच मराठी भाषा गौरव दिन साजरे करता, मराठी गौरव गीत गाता. आणि तुमच्या पक्षाचे विचारधारक मुंबईची भाषा मराठी नाही हा महाराष्ट्राचा अपमाना नाही का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी जाहीर करावं की तुमची अधिकृत भूमिका आहे की नाही. तसे नसेल तर त्यांनी विधीमंडळात भैयाजी जोशी यांच्या विधानाचा निषेध करावा, तसा ठराव मंजूर करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे जे सत्तेत बसले आहेत ते मिंधे कुठे आहेत? बाळासाहेब ठाकरे यांनी आपले आयुष्य मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी आयुष्य पणाला लावलं. आणि ते विचारवाहक बसलेले आहेत त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी भैयाजी जोशी यांचा निषेध करावा. काल औरंजेबासंदर्भात त्यांनी मोठं भाषण केलं. हे तर औरंगजेबापेक्षा भंयकर कृत्य आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात आपल्या स्वराज्यात ज्या मराठी भाषेला स्थान दिलं, शब्दकोश तयार केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तीव्र शब्दांत निषेध केला पाहिजे, ही आमच्या शिवसेनेची भूमिका आहे. महाराष्ट्रातच यांची हिंमत का होते, कारण इथे लाचार आणि मिंध्यांच मराठी द्रोही सरकार बसलं आहे असा घणाघातही केला.

हे मिंधे स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वाहक समजतात. ते वाहनचालकाच्याही लायकीचे नाहीत. भैयाजी जोशी यांच्या विधानाविरोधात राज्य सरकारला निंदा ठराव आणून त्यांचा धिक्कार करावाच लागेल. नाहीतर तुम्ही मराठी आईचं दूध प्यायलेले नाहीत, तुमच्या दुधात आणि तुमच्या जन्मात भेसळ आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हे सहन करणार नाही, कालपासून आमचं रक्त खवळलं आहे. मराठी माणसाला जागा दिली जात नाही, मराठी खानपानावर बंदी आणल जात आहे, मराठी शाळा बंद केल्या जात आहेत, मराठी माणसाला हद्दपार करण्याचे उद्योग सुरू आहेत. आता तुमचे नेते अधिकृतपणे सांगत आहेत की, मुंबईची भाषा मराठी नाही मग कोणती भाषा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं आणि त्यांचे दोन मिंधे, लाचार उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यात हिंमत असेल तर विधीमंडळात सांगावं आणि फक्त सांगू नका निषेध करा, धिक्कार करा. त्यांना सांगा परत असं वक्तव्य केलं तर याद राखा म्हणून. अबू आझमीवर बोलणं सोपं आहे, अबू आझमीवर बोलणं हे राजकीय ढोंग आहे. पण मराठी भाषेचा सरळ अपमान झालेला आहे. 106 हुतात्म्यांचा अपमान झालेला असून हे औरंगजेबाने केलेले नाही. या औरंगजेबांना तुम्ही काय शिक्षा देणार? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

Comments are closed.