स्मिथनंतर आणखी एका दिग्गज खेळाडूची वन डे क्रिकेटमधून निवृत्ती, चॅम्पियन्स ट्रॉ़फीतून संघ बाहेर होताच केली घोषणा

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल लढतीमध्ये झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ याने निवृत्तीचा निर्णय घेतला होता. स्मिथने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रीडा चाहत्यांना धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरत नाही तोच आणखी एका बड्या खेळाडूने वन डे क्रिकेटला रामराम केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधून संघाने गाळा गुंडाळल्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानसह बांगलादेशचा संघ एकही सामना जिंकू शकला नाही. दोन्ही संघांना साखळीतूनच घरचा रस्त्या धरावा लागला. यानंतर बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकूर रहीम याने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2006 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळलेला मुशफिकूर गेल्या 19 वर्षापासून बांगलादेशच्या वन डे संघाचा आधारस्तंभ होता. मात्र आता त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली.
https://www.youtube.com/watch?v=KKCU5YHZCKE
मी आजपासून वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेत असून सर्व गोष्टींसाठी देवाचे खूप आभार. जागतिक स्तरावर आमची कामगिरी मर्यादित असली तरी जेव्हा माझ्या देशासाठी मैदानात उतरलो तेव्हा मी समर्पणाने आणि प्रामाणिकपणे खेळलो, 100 टक्क्यांहून अधिक देण्याचा मी प्रयत्न केला, असे मुशफिकूरने पोस्टमध्ये म्हटले.
दरम्यान, मुशफिकूर रहीम याने बांगलादेशकडून 274 वन डे सामने खेळले. यातील 256 डावात फलंदाजी करताना त्याने 9 शतक आणि 49 अर्धशतकांच्या मदतीने 7795 धावा केल्या. 144 ही त्याची वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर विकेटमध्ये त्याने 299 शिकार (243 कॅच आणि 56 स्टंपिंग) केल्या आहेत.
Comments are closed.