चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रकावर डेव्हिड मिलर नाराज, दुबई प्रवासावर कठोर प्रतिक्रिया!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. गुरुवारी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ज्यात त्यांचा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताशी होईल. लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात तीन शतके झाली. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांनी शतके झळकावली, तर डेव्हिड मिलरने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले. मात्र, उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर मिलरने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकावरून आयसीसीवर टीका केली आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी आफ्रिकन संघाला दुबईला जावे लागले आणि नंतर लाहोरला परत यावे लागले याबद्दल डेव्हिड मिलर नाराज आहे. डेव्हिड मिलरच्या शतकाचा आफ्रिकेला फायदा झाला नाही, कारण 363 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला नऊ विकेट गमावून फक्त 312 धावा करता आल्या.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक इतर संघांसाठी फारच विसंगत ठरले. गट फेरी संपल्यानंतर, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला थेट पाकिस्तानमधून दुबईला जाऊन उपांत्य फेरी खेळावी लागली. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा लीग सामना अद्याप बाकी असल्याने, गटातील अव्वल स्थान कोणाला मिळेल याबाबत अनिश्चितता कायम होती. या निकालाच्या प्रतीक्षेत असताना, संभाव्य भारत-सामन्यासाठी दोन्ही संघांना दुबईला प्रयाण करावे लागले

भारताने शेवटच्या गट सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. परिणामी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला उपांत्य सामना झाला, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी पाकिस्तानमध्ये परतावे लागले. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आणि म्हणूनच आयसीसीने भारताचे सर्व सामने दुबईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

डेव्हिड मिलर म्हणाला, “आमच्यासाठी ही केवळ तासभराची उड्डाण होती, पण परिस्थिती तशी सोपी नव्हती. सकाळची वेळ होती, सामना संपताच प्रवास करावा लागला. दुबईला पोहोचायला दुपारचे चार वाजले, त्यानंतर सकाळी 7.30 वाजता परत निघायचे होते. अशा वेळी शरीराला विश्रांतीसाठी आवश्यक वेळ मिळत नाही. पाच तासांच्या प्रवासानंतरही आमच्या पुनर्बलनासाठी पुरेशी संधी नव्हती, त्यामुळे ही आदर्श परिस्थिती नव्हती. जे झालं ते योग्य नाही.”

याशिवाय, मिलरने अंतिम सामना थरारक होईल असे सांगितले आणि स्पष्ट केले, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, माझा कल न्यूझीलंडच्या बाजूने असेल.”

हेही वाचा-

चॅम्पियन्स ट्रॅाफीच्या अंतिम सामन्यात दुबईच्या खेळपट्टीवर कोण मारणार बाजी, फलंदाज की गोलंदाज?
IPL 2025; हैदराबादला मोठा धक्का, घातक गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर; आफ्रिकन खेळाडूची निवड
“मौलवींनी आधी पुस्तके वाचावीत…” रमजानमध्ये रोजा न ठेवल्याच्या प्रकरणावर मोहम्मद शमीच्या भावाची प्रतिक्रिया

Comments are closed.