19 year old boy attacks 36 year old women seriously injured over sexually harassment case sambhajinagar crime news
छत्रपती संभाजीनगर : येथे घडलेल्या एका घटनेने महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. भावकीतील एका 19 वर्षीय मुलाने 36 वर्षीय महिलेवर कटरने सपासप वार केले आहेत. यात महिलेला सव्वादोन फुटांचा एक वार मानेपासून मांडीच्या खालपर्यंत झाला आहे. 280 टाके महिलेला पडलेले आहेत. ही महिला रूग्णालयात मरनयातना सहन करत आहे. ‘सहन होत नाही, पण रडताही येत नाही. कारण, डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग मारते. आता मी करू तरी काय?’ अशी सुन्न करणारी आपबीती महिलेने सांगितली आहे.
पोलिसांनी नराधमाला घेतले ताब्यात
पीडिता अल्पभूधारक शेतकरी असून मजुरी करतात. त्यांना 11 वर्षांची दोन जुळी मुले आहेत. आरोपी नराधम अभिषेक तात्याराव नवपुते ( 19, रा. घारदोन ) या घटनेनंतर संपूर्ण गावात काही घडलेच नाही, अशा आविर्भावात फिरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. न्यायालयाने आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठलाय
एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना पीडित महिलेने घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. “माझ्यावर त्याने एवढे वार केलेत की डॉक्टरला गोधडीवानी माझे अंग शिवावे लागलंय. हे टाके शिवण्यासाठी नुसता दोराच 22 हजार रूपयांचा लागलाय. एकही अवयव असा नाहीये की जिथे फाडलेले नाहीये. त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठलाय. सहन होत नाही, पण रडताही येत नाही. कारण, डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग मारते. आता मी करू तरी काय?” अशी भावना पीडिते महिलेने व्यक्त केली आहे.
मानेपासून मांडीपर्यंत चिरून काढले
“माझी काहीच चूक नसतानाही नराधमाने मला फाडूनच टाकलं. रविवारी दुपारी मी शेतात काम करत असताना अभिषेकचा मला फोन आला. तो म्हणाला की, ‘एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझे जुळवून दे…’ असं कसं ऐकून घेणार? मला खूप राग आला आणि फोन कट केला. त्यानंतर संध्याकाळी मी शेतातलं काम संपवून पांदीच्या रस्त्याने एकटीच जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्यानं माझी वेणी खेचली आणि डोकं दगडावर आपटलं. मला काही कळायच्या आतच त्यानं पहिल्यांदा कटरनं चेहऱ्यावर वार केला. मी ओरडायचा प्रयत्न केला तर त्यानं गळ्यावरच वार केला आणि लगेच सपासप सगळीकडे वार सुरू केले. पाठीवरचा वार तर एवढा भयंकर होता की मानेपासून मांडीपर्यंत चिरून काढले. त्यात माझे ब्लाऊजसुद्धा फाटून गेले. त्याचे वार आणि माझं रक्त काही थांबत नव्हतं. त्यातच त्यानं मोठा दगड उचलला आणि माझ्या खालच्या भागावर मारला. मी आणखीच विव्हळले. तर त्यानी दुसरा दगड माझ्या तोंडावर मारला आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधारच झाला,” अशी काळीज चिर्रर्र करणारी आपबीती महिलेने सांगितली.
मरणापेक्षाही भयानक त्रास
“शुद्धीत आले तेव्हा सगळ्या अंगात आग उठली होती. डोळा पण उघडत नव्हता. थोड्या वेळानं लक्षात आलं की दोन्ही हाताला सलाइन लावलं आहे. कसातरी मी एक डोळा उघडायचा प्रयत्न केला. पण अंगात भरलेल्या ठणक्यामुळे डोळ्यातून पाण्याची धार लागली. पाणी जखमेला लागल्यावर तर आग आणखीच जास्त भडकली. त्यामुळे जखमांनी अंग भरलं असलं तरी आता रडायचीही सोय राहिलेली नाही. त्यातच डोक्यात सारखं येतं की दवाखान्याचे एवढे पैसे आपल्याला झेपायचे नाहीत. आता कसं होणार? मरणापेक्षाही भयानक हा त्रास आहे,” असे पीडित महिलेने म्हटले आहे.
400 मिली रक्त वाया, 5 बाटल्या रक्त दिले
पीडित महिलेवर कटरने केलेल्या हल्ल्यामुळे तब्बल 400 मिली रक्त वाया गेले. संपूर्ण शरीरावर मिळून 280 टाके घालण्यात आले. महिलेला भयावह स्थितीत रूग्णालयात दाखल केले. अतिरिक्त रक्तस्त्राव झालेला असल्याने आतापर्यंत त्यांना 5 बाटल्या रक्त देण्यात आले आहे.
भाऊ उपचारासाठी घर गहाण ठेवणार…
सासरप्रमाणे महिलेच्या माहेरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल, त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. नाइलाज म्हणून पीडितेच्या दोन्ही भावांनी ‘आपल्या तायडीवर देवाची कृपा आहे. ती मोठ्या हल्ल्यातून वाचली. तिचा जीव म्हणजे आमचा जीव आहे,’ असे म्हणत बँकेकडे आपले राहते घर गहाण ठेवून कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
हेही वाचा : ‘भैय्याजी हा चिल्लर माणूस असल्याचे फडणवीसांनी जाहीर करावे,’ जोशींना अनाजीपंत म्हणत ठाकरेंकडून ‘चॅलेंज’
Comments are closed.