Jaykumar gore demands action on breach of privilege against sanjay raut rohit pawar and youtube journalist in vidhan sabha in marathi


Maharashtra Assembly Session 2025 : मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अनेक आरोप करत अधिवेशनातील बुधवारचा दिवस चांगलाच गाजला होता. त्याचवेळी जयकुमार गोरे यांनी आपण असे आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे गोरे यांनी गुरुवारी विधानसभेत संजय राऊत, रोहित पवार आणि युट्यूब चॅनेल चालवणाऱ्या एका पत्रकारावर विशेषाधिकार हक्कभंग प्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग मंजूर करत तो पुढील कार्यवाहीसाठी समितीकडे पाठवण्याचे आदेश दिले. (jaykumar gore demands action on breach of privilege against sanjay raut rohit pawar and youtube journalist in vidhan sabha)

राज्यातील एक मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो, या महिलेला त्रास देतो असा गंभीर आरोप करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मंत्री जयकुमार गोरे यांचे नाव घेतले होते. या आरोपानंतर विविध राजकीय पडसाद उमटले. आमदार रोहित पवारांनीही जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला. या गंभीर प्रकरणावर मंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ खुलासा केला होता.

आज सभागृहात हक्कभंग प्रस्ताव मांडताना जयकुमार गोरे म्हणाले की, 2017 सालच्या जिल्हा न्यायालयात दाखल प्रकरणाचा हवाला देत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमात माझ्याबद्दल बिनबुडाचे, अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरून आरोप केले. हा माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे. सभागृहाच्या कामकाजात अडथळा यावा यासाठी जाणीवपूर्वक केलेले हे कृत्य आहे. सदर गुन्ह्यात 2019 साली कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली. तरीही विविध प्रसारमाध्यमांसमोर माझी जाणीवपूर्वक बदनामी केली असून न्यायालयाचाही अवमान केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतो. त्याशिवाय या सभागृहातील सदस्य रोहित पवार यांनी अधिवेशन सुरू असताना याच प्रकरणावरून आरोप केले, त्यांच्याविरोधातही हक्कभंग मांडत असल्याचे सांगितले.

हेही वाचा – Fadnavis On Marathi : शासनाची भूमिका पक्की आहे, भय्याजी जोशी यांच्या विधानावर काय म्हणाले मुख्यमंत्री

यासोबतच, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका युट्यूब चॅनेलने देखील या प्रकरणात तसेच यासारख्या किमान 87 व्हिडिओ क्लीप जाहीर केल्या आहेत. माझ्या, माझ्या कुटुंबाच्या, पक्षाच्या नेतृत्वाच्या बदनामीसाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचे हे काम आहे. ज्या प्रकरणात न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली त्यात अत्यंत खालच्या पातळीवर जात टीका करण्याचं काम केले. लोकशाहीत प्रसारमाध्यमे हा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे त्यांनी देखील जबाबदारीने वागले पाहिजे. भाषेचा स्तर राखला पाहिजे. असे सांगत जयकुमार गोरेंनी त्या चॅनेल आणि पत्रकाराविरोधात सभागृहात हक्कभंग मांडला.

‘त्या’ निवेदनावरील सही खोटी

दरम्यान, संबंधित प्रकरणी राज्यपालांना कुणीतरी निवेदन दिले त्यातून पुढे आले. हे निवेदन शासनामार्फत पोलिसांना पाठवले. त्याची चौकशी केली तेव्हा ज्यांची निवेदनावर सही होती त्यांनी पोलीस अधीक्षकांना जबाब दिला. निवेदनावरील सही माझी नाही. मी तो अर्ज केला नाही असे स्पष्ट केले. मात्र या निवेदनावरून हे प्रकरण पुन्हा काढले गेले. राज्यपालांना खोटे निवेदन देणे, प्रकरण बाहेर काढून वातावरण निर्मिती करणे, सामान्य कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या नेतृत्वाला बदनाम करणे हे खूप घातक आहे. माझा पराभव झाला नाही त्यातून काही सदस्यांनी हे षडयंत्र केले असा गंभीर आरोपही जयकुमार गोरे यांनी केला.

हेही वाचा – Electricity Bill : वीज बिलं आली आणि ती देखील थकबाकीसह, कैलास पाटलांनी थेट पुरावेच दाखवले

माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन होण्याची वाटही विरोधकांनी पाहिली नाही. एवढीदेखील नीतिमत्ता त्यांच्याकडे नाही, अशी खंत जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला आहे. या खटल्यातील सर्व रेकॉर्ड निष्कसित केले आहे. तरीही सभागृहाचे सदस्य सांगतात, ते रेकॉर्ड आमच्याकडे आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करण्याचा अधिकार कुणी दिला. या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी जयकुमार गोरे यांनी केली. मात्र, यात विरोधकांची चूक नाही, मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो ही माझी चूक आहे. माझ्या मागे कुठल्या राजे-महाराजे, संस्थानिक यांचा आशीर्वाद नाही. सामान्य कुटुंबातून एका युवकाने पुढे यावे आणि राजकीय क्षेत्रात काम करावे हे सहन न होणारी मंडळी अशारितीने काही षडयंत्र करतात आणि कायम बदनामीचा कट केला.

जयकुमार दोषी असेल तर त्याला फासावर लटकवल्याशिवाय सोडू नका मात्र राज्यपालांना बनावट सहीने पत्र देणे, प्लॅन करून बदनामी करणे या सर्वाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

https://youtube.com/watch?v=OMCvXxTA9t0%3Fsi%3DKQDA_SI3pujUZ6ee



Source link

Comments are closed.