Cm devendra fadnavis presents resolution congratulating indian cricket team on champions trophy win in marathi
Fadnavis On Champions Trophy : मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी त्यांनी भारतीय संघाचे भरभरुन कौतुक केले. भारतीय क्रिकेट संघाने रविवारी इतिहास घडवला. चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरत केवळ आठ महिन्यांच्या अंतराने दोन आयसीसी करंडक जिंकून दाखवण्याची दमदार कामगिरी खेळाडूंनी केली. जगभरातील भारतीय क्रिकेट चाहते याचा आनंद साजरा करत आहेत. महाराष्ट्र विधानसभेतही या चॅम्पियनशीपचे पडसाद दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खेळाडूंचे भरभरून कौतुक करताना अभिनंदनाचा एक ठरावही मांडला. (cm devendra fadnavis presents resolution congratulating indian cricket team on champions trophy win)
या स्पर्धेच्या आधी आणि स्पर्धेतही कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख खेळाडू विराट कोहली यांच्या फॉर्मबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत होते. यावरही मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केले. फॉर्म हा टेम्पररी असतो पण क्लास हा पर्मनन्ट असतो. आणि त्याचेच दर्शन कालच्या अंतिम सामन्यात घडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात या टीमने प्रचंड मेहनत केली. शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा कॅप्टन इनिंग्स खेळले. आपली नेहमीची स्टाइल बदलून त्यांनी मध्येच वेगाने, आणि मध्येच संथ अशा प्रकारे खेळी करून 76 धावा जोडल्या. या 76 धावा निर्णायक होत्या. म्हणून मी मनापासून अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “हा विजय असंख्य भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय असून संघाने अनोखी भेट दिली आहे. या सगळ्या टुर्नामेंट दरम्यान भारतीय संघात एक सांघिक भावना पहायला मिळाली. ते स्पिरीट वाखणण्यासारखं असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरसह कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर सर्व खेळाडूंच्या अभिनंदनाचा ठराव फडणवीसांनी विधानसभेत मांडला. विशेष म्हणजे हा ठराव प्रशस्तिपत्राच्या रुपाने संघातील प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहचवला जाणार आहे. विधिमंडळ प्रशासनाकडून हे काम मार्गी लावले जाणार आहे. ठराव मांडण्यापूर्वी फडणवीसांनी आपल्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फॉर्मवरून टीका करणाऱ्यांचाही समाचार घेतला.
टी ट्वेन्टी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारत एकमेव देश झाला आहे. त्यानंतर फडणवीसांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या स्पर्धेत विश्वविजेता ठरलेल्या संघाचे हे सभागृह अभिनंदन करत आहे. तब्बल 12 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर या करंडकाला गवसणी घालण्याची कामगिरी या संघाने केली. विजयाचे धुलिवंदन साजरे केले, असे फडणवीस म्हणाले. हा ठराव नंतर सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. तसेच हा ठराव संघातील सर्व खेळाडूंना पाठवण्यात येईल, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.
वरूण चक्रवर्तीचे विशेष कौतुक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी वरुण चक्रवर्ती या फिरकीपटूचेही विशेष कौतुक केले. आपल्या शालेय जीवनात क्रिकेट खेळलेला वरूण हा नंतर खेळापासून दुरावला. पण त्यानंतर तो आर्किटेक्ट झाला. पण त्याच्या रक्तात क्रिकेट होतं, त्यामुळे तो पुन्हा क्रिकेटकडे वळला. आणि आज त्याच्या फिरकीसमोर सगळे नेस्तनाबूत झाले. त्यांनी आपण काय आहोत हे दाखवून दिलं, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वरुण चक्रवर्तीच कौतुक केलं. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाच्या विकेट्स काढल्या, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
Comments are closed.