Funny moment between ajit pawar and eknath shinde during press conference after Maharashtra Budget 2025


मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राज्याचा 2025 – 26 या वर्षासाठी अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक गमतीशीर गोष्ट घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एकत्रितपणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “गेल्यावेळीही आम्ही तिघे होतो. खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे,” असे म्हणताच अजित पवार हसायला लागले. तर, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील हसू आवरले नाही. पण त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या या विधानावर अजित पवारांनी थेट षटकारच मारला. (Funny moment between ajit pawar and eknath shinde during press conference after Maharashtra Budget 2025)

हेही वाचा : Maharashtra Budget 2025 : हे तर चॅम्पियन बजेट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया 

अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी अर्थसंकल्पामधील घोषणा तसेच इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. तेव्हा सुरुवातीलाच ते म्हणाले की, “गेल्या वेळीही आम्ही तिघे होतो. खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे.” असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे विधान करताच अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इशारा केला आणि थेट षटकारच मारला. ते म्हणाले, “ते काही यांच्या मनातून जात नाही,” असे विधान अजित पवारांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुन्हा एकनाथ शिंदे म्हणाले की, “खुर्च्यांची अदबलाबदल झाली असली तरीही टीम तीच आहे.” त्यावर मग मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “अदलाबदल झाली असली तरी बदलाबदल झालेली नाही.” असे विधान त्यांनी केले. यावर एकनाथ शिंदे यांनी पुढे अर्थसंकल्पाबाबत म्हणाले की, “आम्ही एक टीम म्हणून गेल्या अडीच वर्षांपासून चांगले काम करत आहोत. तेच काम आताही आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आज आमच्या सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा असा अर्थसंकल्प आहे.” असे म्हणत आपली प्रतिक्रिया दिली.

याआधीही असेच घडले होते

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतही एकनाथ शिंदेंनी असेच विधान केले होते. “सरकारची नवी टर्म असली, तरी आमची टीम जुनीच आहे. (मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बोट दाखवत) आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादांचे बरे आहे. नो टेन्शन,”, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. त्यावर एकनाथ शिंदेंना उद्देशून अजित पवार म्हणाले होते की, “तुम्हाला फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू?” अजित पवारांचे हे विधान ऐकून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना हसू अनावर झाले होते.



Source link

Comments are closed.