मृत महिलेच्या नावावर जयकुमार रावल यांनी ढापली दहा एकर जमीन, मंत्र्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे खळबळ

राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री भाजपचे जयकुमार रावल यांनी चक्क मृत महिलेच्या नावावर तब्बल दहा एकर जमीन ढापल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिंदखेडा न्यायालयाने याप्रकरणी 14 वर्षांपूर्वी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

राज्यात महायुती सरकार आल्यापासून मंत्री आणि आमदारांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे दररोज समोर येत आहेत. यामध्ये आता भाजपच्या जयकुमार रावल यांचे नावही समोर आले आहे. रावल यांनी 1993मध्ये निमगुळ गावात एका मृत महिलेच्या जागी दुसरी महिला उभी करून हा भ्रष्टाचार केला. यासाठी त्यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करीत जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आणि संपूर्ण प्रकार कायदेशीर करण्यासाठी अधिकाऱयांवर दबाव आणल्याचा आरोपही गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन

न्यायालयाने आदेश देऊनही कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे राज्यात सत्तेचा किती गैरवापर होतोय हे स्पष्ट होत असल्याचे अनिल गोटे यांनी म्हटले आहे. रावल यांच्यावर याआधी भ्रष्टाचार, जमीन हडपणे आणि सत्तेचा गैरवापर असे अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र राजकीय शक्तीचा दबाव आणून हे गुन्हे दाबले जातात. त्यामुळे रावल यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे गोटे यांनी म्हटले आहे. यानंतरही कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही गोटे यांनी दिला आहे.

असे आहे प्रकरण

निमगुळ येथील जयचंद्र अॅग्रो इंडिया कंपनीने 1993मध्ये 10 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र याच दरम्यान जमिनीची मालकी असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. अशा स्थितीमध्ये जयकुमार रावल यांनी मृत महिलेच्या जागी दुसऱया महिलेला उभे करून खोटी कागदपत्रे तयार करून जमीन ढापली.

Comments are closed.