हरला हिंदुस्थान, फटका इंग्लंडला; डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत हिंदुस्थान नसल्यामुळे एमसीसीला 45 कोटींचे नुकसान

अवघे क्रिकेट विश्व हिंदुस्थानी संघाच्या अवतीभवती फिरू लागलेय. याचे ताजे उदाहरण म्हणजे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीत हिंदुस्थानी संघ स्थान मिळवू न शकल्यामुळे लॉर्ड्स स्टेडियमच्या मेरिलबोन क्रिकेट समितीला (एमसीसी) थेट 45 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे डब्ल्यूटीसीचा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा अंतिम सामना लॉर्ड्सला चांगलाच महागात पडणार आहे.
डब्ल्यूटीसीच्या गेल्या दोन्ही अंतिम सामन्यात हिंदुस्थानी संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे या सामन्यांना हिंदुस्थानी चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. यंदाही हिंदुस्थानी संघाची कामगिरी जबरदस्त होती. हिंदुस्थानी संघाचा खेळ पाहता एमसीसीने लॉर्ड्सवरील सामन्यांच्या तिकीटांचे दर वाढवले होते. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱयावर हिंदुस्थानच्या दारुण पराभवामुळे डब्ल्यूटीसीचे समीकरण बदलले आणि हिंदुस्थान अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. या बदलामुळे डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत एमसीसीच्या उत्पन्नात 45 कोटी रुपयांची घट होणार असल्याचा अंदाज खुद्द ‘द टाइम्स’ने एका वृत्ताद्वारे वर्तवला आहे. याचाच अर्थ क्रिकेटची स्पर्धा कुठेही असो, निव्वळ नफा मिळवायचा असेल तर हिंदुस्थानी संघाला नेहमीच अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी आयोजकांना देवाकडे प्रार्थना करावी लागणार.
तिकिटांचे दर कमी केल्यानंतरही कमी उत्साह
हिंदुस्थानी संघाचे जगभरात इतके प्रचंड चाहते आहेत की, जगाच्या कोणत्याही कोपर्यात क्रिकेटचा सामना असेल तर हजारोंच्या संख्येने हिंदुस्थानी चाहते संघाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी पोहोचतात. हिंदुस्थानी चाहत्यांच्या या वेडामुळे हिंदुस्थानी सामन्यांच्या तिकिटांचे दर नेहमीच चढे असतात. मात्र लॉर्ड्सचा अंतिम सामना हिंदुस्थानशिवाय खेळला जाणार असल्यामुळे एमसीसीने आपल्या तिकिटांचे दर अर्ध्या किमतीत ठेवले असूनही या तिकिटांना अद्याप अपेक्षित प्रतिसाद लाभलेला नाही. हिंदुस्थान लॉर्ड्सवर खेळणार, या अपेक्षेने एमसीसीने तिकिटांचे दर 75 ते 130 पाऊंडदरम्यान निश्चित करण्यात आले होते. ते आता थेट 50 पाऊंडनी कमी करण्यात आले आहेत. तिकिटांचे दर कमी केल्यामुळे एमसीसीला किमान 45 कोटींचा फटका बसणार आहे. तसेच प्रेक्षकांच्या कमी संख्येमुळे अन्य गोष्टींवरही त्याचा प्रभाव जाणावणार असल्याचे संकेत एमसीसीला मिळू लागले आहेत. गेल्या वर्षी श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीच्या चौथ्या दिवशी केवळ नऊ हजार प्रेक्षक आल्यामुळे एमसीसीला टीकेला सामोरे जावे लागले होते. कमी प्रेक्षक संख्येमुळे एमसीसीला आपल्या तिकिटांच्या दरांबाबात पुनर्विचार करावा लागला होता. आताही त्यांच्यावर तीच परिस्थिती ओढावली आहे.
Comments are closed.