परवानगीशिवाय महिलेचा फोटो सरकारी जाहिरातींवर वापरलातच कसा, मोदी सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाला कोर्टाची नोटीस

महिलेच्या परवानगीशिवाय तिचा फोटो सरकारी जाहिरातींवर झळकल्याने मोदी सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयावर उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. याचे उत्तर तुम्हाला प्रतिज्ञापत्रावर द्यावेच लागेल, असे बजावत न्यायालयाने ग्रामविकास मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.
या महिलेचे फोटो ओडिशा, तेलंगणा व कर्नाटक सरकारच्या जाहिरातींवरही लावण्यात आले आहेत. त्याचीही न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली. या तिन्ही राज्यांना न्यायालयाने नोटीस जारी करून याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी 24 मार्च 2025 रोजी होणार आहे.
अमेरिकन कंपनीला नोटीस
शटर स्टाक या अमेरिकन कंपनीच्या संकेतस्थळावर या महिलेचे फोटो उपलब्ध आहेत. हिंदुस्थानी नागरिकाचे फोटो अशा प्रकारे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा परदेशी कंपनीला अधिकार आहे की नाही हे तपासायला हवे. यासाठी या कंपनीला नोटीस जारी केली जात आहे. अमेरिकन कौन्सिलेटमार्फत ही नोटीस देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
काय आहे प्रकरण
नम्रता कवळे यांनी ही याचिका केली आहे. काही वर्षांपूर्वी तुकाराम कर्वे हे आमच्या गावात आले होते. त्यांनी माझे फोटो काढले होते. नंतर त्यांनी हे फोटो माझी परवानगी न घेताच शटर स्टाक संकेतस्थळावर अपलोड केले. हे फोटो विविध राज्यांतील सरकारी योजनांच्या जाहिरातींवर वापरण्यात आले. संपूर्ण देशभरात होर्डिंग्जवर, सोशल मीडियावर माझे फोटो लावण्यात आले. यासाठी माझी संमती घेण्यात आली नाही. माझे फोटो वापरण्यास मनाई करावी व जो कोणी माझे फोटो वापरेल त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
Comments are closed.