वायएसआर कॉंग्रेस सरकार 3 वर्षात परत येईल

जगनमोहन रेड्डी यांचा दावा : तेदेपने साधला निशाणा

वृत्तसंस्था/ अमरावती

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि युवजन श्रमिक रायथू काँग्रेसचे प्रमुख वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी राज्यात पुन्हा पक्षाचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. पुढील 3 वर्षांमध्ये राज्यात वायएसआर काँग्रेस सत्तेवर येणार आहे. सत्तारुढ रालोआला स्वत:ची आश्वासने पूर्ण करण्यास अपयश आल्याचे जगनमोहन यांनी म्हटले आहे.

वायएसआर काँग्रेसच्या 15 व्या स्थापनादिनी ताडेपल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला त्यांनी संबोधित पेले आहे. वायएसआर काँग्रेस नेहमीच सामान्य जनतेचा आवाज राहिला आहे. आमच्या प्रयत्नांचा आम्हाला अभिमान आहे, कारण लोक आमच्या पक्षाचे स्वागत करत आहेत, आमचा पक्ष आश्वासनांची पूर्तता करणारा असल्याचा दावा जगनमोहन यांनी केला.

नायडू सरकारवर आरोप

माजी मुख्यमंत्री जगनमोहन यांनी वर्तमान मुख्यमंत्री अन् तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर आरोप केले. नायडू यांच्या कार्यकाळाला आतापर्यंत 10 महिने पूर्ण झाले असून त्यांनी स्वत:च्या ‘सुपर सिक्स’ आश्वासनांकडे दुर्लक्ष केले आहे. या योजनांमध्ये 19-59 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य, युवांसाठी 20 लाख नोकऱ्या किंवा 3 हजार रुपयांचा बेरोजगारी भत्ता आणि महिलांसाठी मोफत बस प्रवासाचे आश्वासन सामील होते असे जगनमोहन म्हणाले.

पायाभूत विकासाकडे दुर्लक्ष

नायडू सरकार आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि प्रशासनात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे मुले त्रस्त आहेत, खासकरून विद्याथीं शुल्क परत मिळविण्यात समस्या येत आहे. दरवर्षी 2800 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असताना आतापर्यंत केवळ 700 कोटी रुपयेच उपलब्ध करविण्यात आले आहेत. सरकार मागील वर्षाची थकबाकी आता देत आहे, तर यंदाचा भार पुढील वर्षात ढकलत असल्याचा आरोप जगनमोहन यांनी केला.

Comments are closed.