ओवायसी ममता बॅनर्जीचा तणाव वाढवेल

पश्चिम बंगालच्या सर्व जागांवर नजर

वृत्तसंस्था/ कोलकाता

एआयएमआयएम म्हणजेच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनची नजर आता पश्चिम बंगालवर केंद्रीत झाली आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष पश्चिम बंगालमधील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. एआयएमआयएमने 2021 ची विधानसभा निवडणूक लढविली होती, परंतु पक्षाला त्यावेळी फारसा ठसा उमटविता आला नव्हता.

बंगालमध्ये आमचे 3 लाख सदस्य आहेत. तर मालदा आणि मुर्शीदाबाद येथील 2023 च्या पंचायत निवडणुकीत आम्ही 1.5 लाख मते मिळविली होती. 2021 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा आगामी निवडणुकीतील स्थिती वेगळी राहणार असल्याचे वक्तव्य एआयएमआयएम नेते मोहम्मद इमरान सोलंकी यांनी केले आहे.

राज्यात आम्ही शांतपणे तळागाळात काम करत आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे करू इच्छितो आणि ब्लॉक पातळीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदू ओळख सादर करत आहेत, तर भाजप वेगळाच डाव खेळत आहे यात केवळ जनता पराभूत होत आहे. मतदारांना पर्यायाची गरज आहे. उत्तर बंगाल आणि मालदामध्ये आमचा जनाधार मजबूत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

एआयएमआयएम संबंधित जिल्ह्यांमध्ये घरोघरी जात सदस्यत्व अभियान राबवत आहे. तसेच जिल्ह्यांमध्ये पक्षाकडुन इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात आहे. निवडणुकीपूर्वीच्या ईदनंतर ओवैसी हे राज्याचा दौरा करणार असून अनेक सभांना संबोधित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बंगालच्या लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण  27 टक्के इतके अधिक आहे.

2021 मध्ये पक्षाने मालदा, मुर्शीदाबाद आणि उत्तर दिनाजपूर जिल्ह्dयांमध्ये 7 उमेदवार उभे केले होते. परंतु एआयएमआयएमला तेव्हा खास कामगिरी करता आली नव्हती. राज्यात एकूण 294 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2021मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने बहुमत मिळविले होते. तर राज्यात भाजप दुसऱ्या स्थानावर राहिला होता.

Comments are closed.