फुकट वस्तू वाटून गरीबी हटणार नाही, रोजगार निर्मितीवर भर द्या; नारायण मूर्ती संतापले

इन्फोसिसचे सहसंस्थापक एन.आर. नारायण मूर्ती हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विधानामुळे चर्चेत आहेत. दरम्यान त्यांच्या अजून एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नारायण मूर्ती यांनी राजकीय पक्षाकडून मिळणाऱ्या फुकटच्या गोष्टींवर टीका केली आहे. मोफत वस्तू वाटण्यापेक्षा, लोकांना रोजगार द्या. नवीन उद्योग सुरू करूनही गरीबी कमी करता येऊ शकते, असे ते म्हणाले.
एन. आर. नारायण मूर्ती मुंबईत झालेल्या टायकॉन 2025 परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी रोजगार निर्मिती, एआयचा वाढता वापर यावर भाष्य केलं. तसेच रोजगार निर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले. ‘मला विश्वास आहे की तुमच्यातला प्रत्येकजण रोजगार निर्माण करू शकतो. आणि अशा प्रकारे तुम्ही गरीबीची समस्या सोडवाल याबद्दल मला शंका नाही. पण मोफत वस्तू वाटून तुम्ही गरीबी दूर करू शकत नाही. कोणताही देश यात यशस्वी झालेला नाही’, असे नारायण मूर्ती म्हणाले.
मी कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दृष्टिकोनातून बोलत नसून धोरणात्मक सूचना देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सरकारी मदतीसोबतच जबाबदारीही असली पाहिजे. ज्याचा आपण लाभ घेतो त्याचा फायदाही करून घेता आला पाहिजे. 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिल्यास राज्य सरकारने सहा महिन्यांनंतर अशा घरांमध्ये सर्वेक्षण करून मुलं जास्त अभ्यास करत आहेत की नाही हे देखील पाहणे गरजेचे आहे, असे महत्त्वाचे विधान नारायण मूर्ती यांनी केले.
दरम्यान, नारायण मूर्ती यांनी रोजगार निर्मितीसोबतच AI च्या होणाऱ्या अतिवापरावरही भाष्य केलं. एआयचे नवे अॅप्लिकेशन्स हे केवळ जुन्या काही गोष्टी नव्याने मांडणारे आहेत. मात्र, एआयचा खरा वापर हा महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी होणे गरजेचे आहे. त्यामुळे तरुणांनी याचा योग्य वापर करून समस्यांवर उपाय शोधून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन नारायण मूर्ती यांनी केले.
Comments are closed.