'भारतीय संघ एकावेळी तीन देशांशी खेळू शकते', मिचेल स्टार्कनं केलं टीम इंडियाचं काैतुक

भारतीय क्रिकेट सध्या युवा आणि स्टार खेळाडूंनी समृद्ध आहे. आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी या उदयोन्मुख खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा दिसून येते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करूनही अनेक खेळाडूंना राष्ट्रीय संघात संधी मिळण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. भारतीय क्रिकेटमधील या प्रतिभेची खोली पाहून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने कौतुक केले आहे.

स्टार्क म्हणाला, “भारत हा कदाचित एकमेव देश आहे, जिथे एकाच वेळी तीन वेगवेगळ्या संघ ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघाविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळू शकतात, आणि तरीही ते पूर्णपणे स्पर्धात्मक राहतील.” तो फॅनॅटिक्स टीव्ही या यूट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात बोलत होता.

भारतीय क्रिकेटचा दर्जा सातत्याने उंचावत आहे, यामागे आयपीएलचा मोठा वाटा आहे. दरवर्षी आयपीएलमध्ये नव्या खेळाडूंना मोठ्या संधी मिळतात, त्यामुळे भारताला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मोठा फायदा होतो. यावर भाष्य करताना स्टार्क म्हणाला, “आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटपटूंना मोठ्या प्रमाणात अनुभव मिळतो. जगभरातील क्रिकेटपटूंना विविध फ्रँचायझी लीग खेळण्याची संधी मिळते, मात्र भारतीय खेळाडूंना केवळ आयपीएलमध्येच खेळता येते.”

त्याने यावर पुढे भाष्य करताना सांगितले की, “भारतीय खेळाडूंची गुणवत्ता आणि त्यांच्या क्षमतेवर कोणतीही शंका नाही. ते सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आयपीएलमधील तीव्र स्पर्धेमुळे नव्या खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर चमकण्याची संधी मिळते. त्यामुळे भारताच्या क्रिकेटमध्ये नवे खेळाडू झपाट्याने पुढे येत आहेत.”

Comments are closed.