आपच्या नेत्यांविरूद्ध फिर्यादीला परवानगी दिली गेली
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंदर जैन यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात एफआयआर आणि अभियोग सादर करण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनुमती दिली आहे. हे प्रकरण 1 हजार 300 कोटी रुपयांच्या वर्गखोल्या घोटाळ्याचे आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार असताना सरकारी शाळांमध्ये नव्या वर्गखोल्या बांधण्याची योजना तयार करण्यात आली होती. तथापि, या वर्गखोल्यांचे बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात भष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. ही चौकशी सध्या केली जात आहे.
केंद्रीय दक्षता आयोगाने आपल्या 17 फेब्रुवारी 2020 च्या अहवालात या गैरव्यवहारासंबंधी विवेचन केले होते. 2 हजार 400 वर्गखोल्यांचे बांधकाम दिल्ली सरकारकडून करण्यात आले होते. या कामाचे उत्तरदायित्व दिल्लीच्या सार्वजनिक कामे विभागाकडे सोपविण्यात आले होते. या बांधकामाचा खर्च वाढवून दाखविण्यात आल्याची नोंद दक्षता आयोगाने आपल्या या अहवालात केली होती. दिल्ली सरकारच्याच दक्षता आयोगाने या घोटाळ्याची चौकशी करण्याची सूचना दिल्ली सरकारच्या सचिवांना पाठविलेल्या अहवालात केली होती. मात्र, आम आदमी पक्षाच्या सरकारने या अहवालावर मिठाची गुळणी धरली होती. दिल्लीत 2025 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले असून आता या प्रकरणांची चौकशी केली जात आहे. अशी आणखी अनेक प्रकरणे असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले आहे.
Comments are closed.