ओडिशा असेंब्लीमध्ये 'पोलावराम' वर गोंधळ उडाला, बीजेडीने बीजेपीवर आरोप केले

वृत्तसंस्था/भुवनेश्वर

ओडिशा विधानसभेत गुरुवारी पोलावरम धरण प्रकल्पावरुन गदारोळ झाला, यामुळे विधानसभेचे कामकाज दोनवेळा स्थगित करावे लागले. सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच बीजदचे आमदार अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत पोहोचले आणि पोलावरम प्रकल्पावर चर्चेची मागणी करू लागले. अध्यक्ष सुरमा पाढी यांनी बीजदच्या आमदारांची नोटीस फेटाळल्यावर विरोध आणखी तीव्र झाला. बीजदच्या आमदारांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच भाजप ओडिशाच्या हितांकडे दुर्लक्ष करत आंध्रप्रदेशात राजकीय लाभ मिळवत असल्याचा आरोप बीजदने केला आहे.

सभागृहातील गोंधळ वाढल्यावर अध्यक्षांनी प्रथम एक तासासाठी कामकाज स्थगित केले आणि पुन्हा सभागृह सुरू झाल्यावरही गोंधळ कायम राहिला. यामुळे अध्यक्षांनी पुन्हा कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पोलावरम प्रकल्प पूर्ण झाल्यास ओडिशाला गंभीर नुकसान पोहोचेल. आंधप्रदेशकडून हा प्रकल्प मनमानीपणे निर्माण करण्यात येत असून हा प्रकार चिंताजनक आहे. यावर चर्चा करण्याची गरज असल्याचे बीजद आमदार प्रसन्ना आचार्य यांनी म्हटले आहे.

हे प्रकरण अद्याप विचाराधीन असून यावर चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली. पोलावरम प्रकल्पाचे डिझाइन रालोआ सरकारदरम्यान बदलण्यात आले होते आणि या प्रकल्पावरुन ओडिशात मोठे संकट उभे ठाकू शकते असा दावा बीजदचे वरिष्ठ आमदार अरुण कुमार साहू यांनी केला आहे. विधानसभेत या मुद्द्यावर चर्चा न करण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाचे भाजप आमदार इराशीष आचार्य यांनी समर्थन केले. नियमांनुसार विचाराधीन प्रकरणांवर चर्चा केली जाऊ शकत नसल्याचे आचार्य यांनी म्हटले आहे.

Comments are closed.