होळीने बाधित झालेल्यांसाठी विशेष परीक्षा दिली जाईल
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सध्या देशभर सीबीएसईच्या परीक्षा होत असून, ज्या विद्यार्थ्यांना होळी आणि रंगपंचमीमुळे परीक्षा केंद्रावर जाता आलेले नाही, त्यांच्यासाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये हे सण मोठ्या प्रमाणात साजरे होत असल्याने अशा भागांमध्ये परीक्षार्थी या सणांमुळे प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, असे सीबीएसईच्या व्यवस्थापनाने एका वक्तव्यात स्पष्ट केले आहे.
कोणताही पात्र विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, हे सुनिश्चित केले जाईल. देशात बहुतेक सर्व ठिकाणी शुक्रवारी 14 मार्चला रंगपंचमी (याच सणाला होळी असेही काही भागांमध्ये म्हटले जाते) साजरी केली जाते. तथापि काही भागांमध्ये ती 15 मार्चला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे काही विद्यार्थी 15 मार्चला परीक्षा केंद्रांपर्यंत सकाळी जाऊ शकत नाहीत. हे लक्षात घेऊन, अशा विद्यार्थ्यांची हानी होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व परीक्षा केंद्रांना या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. जे विद्यार्थी 15 मार्चला परीक्षेला जाऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी ही व्यवस्था आहे, असा आदेश काढण्यात आला. या व्यवस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे. हिंदी कोअर आणि हिंदी इलेक्टिव्ह या 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या परीक्षा 15 मार्च 2025 या दिवशी घेण्यात येणार आहेत. 12 वीची परीक्षा 2 एप्रिलपर्यंत, तर 10 वीची परीक्षा 18 मार्चपर्यंत आहे.
Comments are closed.