शेतकरी आत्महत्या करतोय आणि पंतप्रधान मोदी गंगाजल घेऊन जगभर फिरताहेत, संजय राऊत यांचा घणाघात

‘महाराष्ट्रात रोज 8 शेतकरी आणि देशात रोज 22 शेतकरी आत्महत्या करतात. ही या राज्याची, देशाची परिस्थिती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगाजल घेऊन जगभरात फिरताहेत. आज मॉरिशस, उद्या नेपाळ तर परवा म्यानमारला जातील. इकडे शेतकरी रोज मरतोय आणि हे जगभरात फिरताहेत’, असा जबरदस्त टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. शुक्रवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

‘महाराष्ट्रामध्ये युवा पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने आत्महत्या केली हे अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सराकर हे फक्त बोलतंय, घोषणा करतंय, पण प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती काय आहे? हे राज्य प्रगतिपथावर आहे असे तुम्ही म्हणता. पण हे राज्य प्रगतिपथावर नसून अधोगतीला लागलेले आहे’, असेही राऊत यावेळी म्हणाले.

एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक आणि जिओ-एअरटेलमधील करारामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असून सर्वसामान्यांचा डेटा विकला जाईल, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली. जनतेचा, देशाचा डेटा हा विदेशी कंपन्यांच्या हाती लागेल. मोदींनी ट्रम्पसोबत काय सौदा केला माहिती नाही. पण या सौदेबाजीमुळे देशाच्या जनतेच्या अधिकारांवर गडांतर येत आहे, असे राऊत म्हणाले.

ट्रम्प यांच्याशी मैत्री वाढवण्यासाठी PM मोदींनी जिओ-एअरटेलसोबतच्या स्टारलिंक करार करण्यास मदत केली, काँग्रेसचा दावा

केंद्राच्या धरतीवर राज्य सरकारही व्यक्तीस्वातंत्र्याबाबत एक कायदा आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे व्यक्तीस्वातंत्र्यवर गदा येण्याची शक्यता आहे का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, ‘व्यक्तीस्वातंत्र्यासाठी आमच्या सारखे लोक सतत लढा देत आलेले आहेत. तुम्ही आमच्या हक्कांची गळचेपी करणार असाल तर या देशामध्ये लोक स्वस्थ बसणार नाही. तुम्ही धर्माची अफू किंवा भांग देऊन स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही. सरकारला वाटत असेल की, आमच्याविरुद्ध कोण उभे राहिल. पण आमच्यासारखे लाखो लोक सरकारच्या दडपशाहीविरुद्ध ताकदीने उभे रहतील. आम्हाला देशाचे, जनतेचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, भाजपचे स्वातंत्र्य नाही.’

संकुचित, धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतोय; संजय राऊत यांचा निशाणा

Comments are closed.