IPL 2025 – दिल्लीची धुरा ‘बापू’च्या खांद्यावर, अक्षर पटेल Delhi Capitals संघाचा नवा कर्णधार

इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामाला सुरुवात होण्यास जवळपास एक आठवडा बाकी आहे. 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात ईडन गार्डन्सवर सलामीचा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाने नवीन कर्णधाराची घोषणा केली. गेल्या 11 वर्षापासून आयपीएलमध्ये गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाद्वारे छाप उमटवणाऱ्या अष्टपैलू अक्षर पटेलकडे दिल्ली संघाची धुरा सोपवली आहे.

ऋषभ पंतनंतर दिल्लीचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. आधी केएल राहुल दिल्लीचे नेतृत्व करणार अशी चर्चा होती. राहुलला दिल्लीने 14 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले होते. मात्र राहुल ऐवजी दिल्लीने अक्षर पटेलला प्राधान्य दिले आणि कर्णधारपदाची माळ त्याच्या गळ्यात पडली.

टी-20 मध्ये अक्षरकडे नेतृत्वाची क्षमता असल्याने त्याने सिद्ध केलेले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने 16 टी-20 सामने खेळले असून यात 10 सामने जिंकले आहेत. तसेच गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या लढतीतही त्याने दिल्लीचे नेतृत्व केले होते. त्या लढतीत दिल्लीला 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

टी-20 मध्ये कर्णधार म्हणून खेळताना अक्षर पटेल याने 36.40 च्या सरासरीने 364 धावा केल्या आहेत. 57 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. गेल्या वर्षी आरसीबीविरुद्ध खेळताना त्याने ही खेळी केली होती. तर गोलंदाजीमध्ये त्याने 29.07 च्या सरासरीने 13 विकेट्स घेतलेल्या आहेत.

कर्णधारपदाची धुरा मिळताच अक्षर पटेल म्हणाला की, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल संघ मालक आणि सपोर्ट स्टाफचे आभार. दरम्यान, दिल्लीचा संघ आपला पहिला सामना 24 मार्चला लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळणार आहे.

दिल्लीचा संघ

अक्षर पटेल (कर्नाधार), कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टॅब्स, अभिषेक पोरेल, मिशेल स्टार्क, केएल राहुल, जेक फ्रेझर-मकगार्क, टी. नटराजन, कारुन नायर, समीर रिझवी, अशुशोश शर्मन नाथा चमेरा, डोनोव्हन चिना, डोनोबी फेरेरा, अजय मंडी, त्रिपुराना विजय, माधव तिवारी.

Comments are closed.