इंझमाम-उल-हक पुन्हा बरळला, आयपीएलवर बहिष्कार टाकण्याची हाक

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकनं ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान आणि इतर क्रिकेट मंडळांना आयपीएलवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं आहे. माजी क्रिकेटपटू इंझमाम-उल-हकनं म्हटलं आहे की, इतर बोर्डांनी त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये पाठवणे थांबवावे. जर बीसीसीआय आपल्या खेळाडूंना परदेशी टी लीगमध्ये पाठवत नसेल, तर इतर बोर्डांनीही कठोर भूमिका घ्यावी आणि त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये पाठवू नयेत, असं इंझमाम-उल-हकचं मत आहे.

बीसीसीआय भारतीय पुरुष क्रिकेटपटूंना परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी पाठवत नाही. मात्र, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर यांना बीबीएल, वर्ल्डकप प्रीमियर लीग आणि द हंड्रेडमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. बीसीसीआयने त्यांच्या पुरुष क्रिकेटपटूंना परदेशी फ्रँचायझी टी20 लीगमध्ये भाग घेण्यास बंदी घातली आहे.

“चॅम्पियन्स ट्रॉफी बाजूला ठेवा, तुम्ही आयपीएलकडे पहा, जिथे जगातील अव्वल खेळाडू सहभागी होतात,” इंझमाम-उल-हकनं एका पाकिस्तानी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले. पण भारतीय खेळाडू इतर लीगमध्ये खेळायला जात नाहीत. या कारणास्तव, सर्व बोर्डांनी त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये पाठवणे थांबवावे. जर तुम्ही तुमच्या खेळाडूंना कोणत्याही लीगसाठी सोडलं नाही तर इतर बोर्डांनीही भूमिका घेऊ नये का?”

भारतीय क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतरच परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी आहे. दिनेश कार्तिकने गेल्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर तो SA20 लीगमध्ये पार्ल रॉयल्सकडून खेळला. युवराज सिंग आणि इरफान पठाण सारख्या खेळाडूंनी GT20 कॅनडा आणि लंका प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे.

Comments are closed.