पुतीन यांना युद्ध थांबवायचे नाही, पण ट्रम्प यांना सांगायला घाबरतात; युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या दाव्याने युद्ध आणखी भडकणार

रशिया आणि युव्रेन यांच्यातील युद्ध थांबावे यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. अमेरिकेचे एक शिष्टमंडळ त्यासाठी रशियाला जाणार आहे. अशा वेळी युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भडकावणारा दावा केला आहे. पुतीन यांना युद्ध थांबवायचे नाही, परंतु ते ही गोष्ट ट्रम्प यांना सांगायला घाबरतात, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन देशांमधील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

युद्धविरामाबद्दल पुतीन यांची भूमिका संभ्रमात टाकणारी आहे, अशी टीकाही झेलेन्स्की यांनी केली आहे. पुतीन यांनी युद्धविरामाला समर्थन दिले आहे. परंतु चिंताही व्यक्त केली आहे, याकडे झेलेन्स्की यांनी लक्ष वेधले आहे. पुतीन यांनी युद्धविरामाबद्दल ठोस भूमिका कधीच मांडली नाही. अमेरिकेने रशियाला कुठल्याही अटीशर्तींविना युद्धविराम प्रस्ताव मान्य करण्याची विनंती केली होती. परंतु पुतीन यांनी यात अनेक अडथळे असल्याचे म्हटले होते, असेही झेलेन्स्की यांनी सांगितले.

शांततेतील योगदानाबद्दल पुतीन यांनी मानले नरेंद्र मोदी यांचे आभार

रशिया आणि युव्रेन यांच्यात शांतता करार होण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच अमेरिका, ब्राझील, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाचेही शांतता करारासाठी महत्त्वाचे योगदान असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. या नेत्यांनी शांततेसाठी भरपूर वेळ दिला असून त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत असे पुतीन म्हणाले. युद्धाचे युग नाही, संवाद हाच मार्ग असा संदेश मोदींनी दिला होता, याचीही आठवण पुतीन यांनी करून दिली.

युव्रेनियन सैनिकांना जिवंत सोडा – ट्रम्प

अखेर हे भयानक, रक्तरंजित युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता आहे. परंतु या क्षणाला हजारो युव्रेनियन सैनिक हे पूर्णपणे रशियन लष्कराने वेढलेले आहेत. मी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे त्यांना जिवंत सोडण्यासाठी विनंती केली आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. हा एक भीषण नरसंहार असेल, जो दुसऱया महायुद्धानंतर कधीही पाहिला गेला नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Comments are closed.