77 दहशतवादी जम्मू -काश्मीरमध्ये लपून आहेत
77 पैकी 60 दहशतवादी पाकिस्तानी : सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
सर्कल संस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही काळात दहशतवादी कारवायांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. परंतु याचदरम्यान केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये 77 दहशतवादी लपले असल्याचा इनपूट सुरक्षा यंत्रणांना गुप्तचर संस्थांकडुन मिळाला आहे. हे दहशतवादी सुरक्षा दल किंवा नागरिकांना लक्ष्य करण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील 60 दहशतवादी हे पाकिस्तानशी संबंधित असून ते लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे सदस्य असल्याचे समोर आले आहे.
या 60 विदेशी दहशतवाद्यांपैकी सर्वाधिक 35 दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाचे आहेत. तर जैश-ए-मोहम्मदचे 21 तर सर्वात कमी दहशतवादी हिजबुल मुजाहिदीनचे आहेत. तर जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्तरावरही 17 दहशतवादी सक्रीय आहेत. यातील 3 जम्मू क्षेत्रात तर 14 काश्मीर खोऱ्यात सक्रीय आहेत.
पर्वतीय अन् जंगल क्षेत्रात लपून
हे सर्व दहशतवादी 2-3च्या छोट्या समुहात लपलेले आहेत. यातील बहुतांश दहशतवादी पर्वतीय आणि जंगलाच्या क्षेत्रांमध्ये लपले आहेत. संधी मिळताच हे दहशतवादी रस्तेमार्गावर किंवा लोकांवर हल्ले करत आहेत. इनपूट मिळाल्यावर सुरक्षा दलांसोबत त्यांचे अनेक साथीदार चकमकीत मारले गेले आहेत, तरीही सध्या 77 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये लपून बसले आहेत.
2024 मध्ये 75 दहशतवाद्यांचा खात्मा
मागील वर्षी 2024 मध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सुमारे 75 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यातील 60 टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते. यावेळी मिळालेल्या गुप्तचर इनपूटमध्ये देखील 77 दहशतवाद्यांपैकी 60 दहशतवादी विदेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे. या विदेशी दहशतवाद्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे. सीमेवरून घुसखोरी करत हे जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांकडून शोध घेतला जात आहे.
कथुआत 3 नागरिकांची हत्या
अलिकडेच 8 मार्च रोजी कथुआमध्ये तीन नागरिकांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेला दहशतवादी हल्ल्याशी जोडून पाहिले जात आहे. एनआयए देखील याप्रकरणी तपास करत आहे. परंतु घटनेचा मुख्य तपास जम्मू-काश्मीर पोलीस करत आहेत. हा दहशतवादी हल्लाच होता का मग अन्य काही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्थानिकांकडुन दहशतवाद्यांना मदत
जम्मू-काश्मीरमध्ये पूर्वीच्या तुलनेत सद्यकघ्ळात दहशतवाद्यांना फारच कमी प्रमाणात स्थानिक लोक मदत करत आहेत, तरीही अद्याप काही स्थानिक लोक दहशतवाद्यांना मदत करत आहेत. हे लोक दहशतवाद्यांना अन्न अन् वास्तव्याची सुविधा देण्यासोबत वाहने पुरविण्यासह पैसेही देत असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे सांगणे आहे. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये बुधवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन जणांना अटक केली होती. या हस्तकांकडून एक पिस्तुल, दोन ग्रेनेड, एके-47 रायफल मॅगजीन आणि दारूगोळा हस्तगत केला होता. तर 22 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या 126 व्या बटालियनने रियासी भागात गोळ्या हस्तगत केल्या होत्या.
Comments are closed.