वाढवणच्या समुद्रातील खनिज तेल सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखले; परवानगी न घेताच घुसखोरी, भूमिपुत्रआक्रमक

पालघरच्या समुद्रात असलेल्या खनिज तेलाच्या खजिन्यावर तेल कंपन्यांची वाकडी नजर वळली आहे. हे तेलाचे साठे नेमके कुठे आहेत हे शोधण्यासाठी एका खासगी कंपनीने कोणत्याही परवानग्या न घेता थेट वाढवणच्या समुद्रात घुसखोरी केली, ही बाब कळताच मच्छीमारांत संतापाची लाट उसळली. या मच्छीमारांनी बोटीतून जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि सर्वेक्षण बंद पाडले.
विनाशकारी वाढवण बंदराला गेल्या 10 वर्षांपासून मच्छीमारांनी कडाडून विरोध केला आहे. मात्र हा विरोध मोडून काढत केंद्र सरकारने वाढवण बंदराला परवानगी दिली आणि त्याचे कामही सुरू केले. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संतापाची खदखद असतानाच आज वाढवणच्या समुद्रात असलेल्या खनिज तेलावर डोळा ठेवून कोस्टल मरीन कन्स्ट्रक्शन अॅण्ड इंजिनीयरिंग लिमिटेड या पंपनीने कोणत्याही आवश्यक परवानग्या न घेता थेट समुद्रात जाऊन सर्वेक्षण सुरू केले. भूमिपुत्र मच्छीमारांना याची माहिती मिळताच कोळीवाडय़ांमध्ये संतापाची लाट उसळली आणि मच्छीमारांनी बोटींवर स्वार होऊन सर्वेक्षणस्थळ गाठले. तुम्हाला इथे येण्याची परवानगी कोणी दिली. तुमच्या सर्वेक्षणामुळे समुद्रातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. आधी परवानग्या दाखवा मगच समुद्रात पाऊल ठेवा, असा सज्जड दम मच्छीमारांनी दिला. त्यानंतर सर्वेक्षण थांबवून पंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पळ काढला.
खनिज तेल रिफायनरीही ठरणार घातक
वाढवण बंदरापाठोपाठ येथील समुद्रात 7 हजार 800 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये तेलाचे साठे आढळून आले आहेत. त्याचा शोध लागताच खनिज तेल रिफायनरी उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही रिफायनरीदेखील विनाशकारी ठरणार असून वाढवण बंदरविरोधी संघटना पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाचा इशारा
दिला आहे.
निसर्गाचा समतोल ढासळणार
कोटय़वधी रुपये खर्च करून वाढवणवासीयांच्या माथी एकीकडे विनाशकारी बंदर लादले असतानाच आता दुसरीकडे कच्च्या तेलाचे उत्पादन सुरू करण्याचा घाट घातला आहे. तसे झाल्यास समुद्र व परिसरातील किनारपट्टीचा नैसर्गिक समतोल ढासळेल, असा इशारा पर्यावरणतज्ञांनी दिला आहे.
पोलिसांनी बजावली 'कारणे दाखवा' नोटीस
वाढवणच्या समुद्रात विनापरवानगी सर्वेक्षण सुरू असल्याची बाब मच्छीमारांनी स्थानिक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कोस्टल मरीन कन्स्ट्रक्शन अॅण्ड इंजिनीयरिंग या पंपनीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीला उत्तर देईपर्यंत सर्वेक्षण करण्यास मनाईदेखील करण्यात आली आहे.
Comments are closed.