‘असेन मी नसेन मी’ नाटकाला ‘माझा पुरस्कार’, ऋषिकेश शेलार, निहारिका राजदत्त सर्वोत्कृष्ट कलाकार

‘महाराष्ट्राचा ऑस्कर’ समजला जाणारा ‘माझा पुरस्कार’ सोहळा 19 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता दादरच्या श्री शिवाजी महाराज मंदिर नाटय़गृहात पार पडणार आहे. ‘असेन मी नसेन मी’ नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून गौरविण्यात येणार आहे. ‘शिकायला गेलो एक’ नाटकासाठी ऋषिकेश शेलार सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ‘उर्मिलायन’ नाटकासाठी निहारिका राजदत्त सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून दरवर्षी माझा पुरस्कार सोहळय़ाचे आयोजन केले जाते. यंदा या पुरस्कार सोहळय़ाचे 19 वे वर्ष आहे. या सोहळय़ात ‘असेन मी नसेन मी’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाटककार म्हणून संदेश कुलकर्णी यांना तर याच नाटकासाठी शुभांगी गोखले यांना सर्वोत्कृष्ट डबल रोलसाठी पुरस्कार जाहीर झाला. ‘उर्मिलायन’ नाटकासाठी सुनील हरिश्चंद्र यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा तर ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ नाटकासाठी संदेश बेंद्रे यांना सर्वोत्कृष्ट नेपथ्यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. पुनरुज्जीवित नाटक या विभागात ‘पुरुष’ हे सर्वोत्कृष्ट नाटक ठरले आहे. याच नाटकासाठी राजन ताम्हाणे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, तर अविनाश नारकर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

प्रेमगीतांची सुरेल मैफल

हिंदी-मराठी प्रेमगीतांची सुरेल मैफल या सोहळय़ाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे असून जयंत पिंगुळकर, केतकी भावे-जोशी, शिल्पा मालंडकर, नीलिमा गोखले, मंदार आपटे यांचे गायन असणार आहे. या पुरस्कार सोहळय़ाच्या मोजक्या विनामूल्य प्रवेशिका 17 मार्चपासून नाटय़गृहावर उपलब्ध असतील.

Comments are closed.