जे.जे. रुग्णालयात दर तासाला होणार 2 हजार 800 चाचण्या; स्वयंचलित बायोकेमिस्ट्री अॅनालायझर दाखल

जे. जे. रुग्णालयात आता दर तासाला 2 हजार 800 चाचण्या होणार आहेत. विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड, मूत्र, प्लाझ्मा तसेच सिरममधील विविध घटक, रसायनांचे प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री अॅनालायझर यंत्र जे. जे. रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना वेगवान चाचण्यांमुळे दिलासा मिळणार आहे.
जे. जे. रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात रोज दोन ते अडीच हजार रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना शारीरिक तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातो; परंतु चाचण्या वेगाने होत नसल्यामुळे रुग्णांना थांबून राहावे लागते. परंतु आता चाचणी नमुन्यांच्या रासायनिक रचनेचा अभ्यास, मूल्यमापन आणि विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येणारे बायोकेमिस्ट्री अॅनालायझर हे अद्ययावत यंत्र उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. दरम्यान, आरोग्य सेवा क्षेत्राच्या पायाभूत सुविधांना चालना देणाऱया उपक्रमांतर्गत जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सर जे. जे. रुग्णालयाच्या बायोकेमिस्ट्री विभागाला हे यंत्र देण्यात आले आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ, संजय सुरासे, बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी दळवी, बालरोग चिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुशांत माने यांच्या उपस्थितीत बायोकेमिस्ट्री अॅनालायझर रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आले.
2 हजार 800 चाचण्यांमध्ये दोन हजार रासायनिक आणि 800 इलेक्ट्रोलाइट चाचण्यांचा समावेश आहे. नवीन अॅनालायझर नियमित बायोकेमिस्ट्री चाचण्या, विशेष प्राथिन चाचण्या, उपचारात्मक औषध निरीक्षक आणि युरीनमध्ये ड्रग्स ऑफ अब्युझ शोधण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावेल.
रुग्णालयाकडून नऊ जणांना जीवनदान
जानेवारीत जळगाव तालुक्यातील विलास पाटील या ट्रक ड्रायव्हरचा मुंबईत गंभीर अपघात झाला. जे. जे. रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. व्हर्नन व्हेल्हो आणि त्यांच्या टीमने पाटील यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. 8 जानेवारी रोजी त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी विलास पाटील यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नऊ जणांवर यशस्वी अवयव प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यांना जीवनदान मिळाले. दरम्यान, रुग्णालयाच्या या कामगिरीमुळे 11 मार्च रोजी झोनल ट्रान्सप्लाण्ट कोऑर्डिनल सेंटरने जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय टीमचे कौतुक केले.
Comments are closed.