राजकोटमध्ये इमारतीच्या आगीत तीन ठार

वृत्तसंस्था/ राजकोट

गुजरातमधील राजकोट शहरातील अटलांटिस इमारतीत शुक्रवारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 30 लोक इमारतीत अडकले होते. आग लागल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. अग्निशमन दलाकडून मदत व बचावकार्य राबविण्यात आले. तसेच आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी क्रेन आणि शिड्यांचा वापर करण्यात आला. ही आग इतकी भीषण होती की वरच्या मजल्यावरील लोकांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटच्या 150 फूट रिंग रोडवर असलेल्या एका बहुमजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की वरच्या मजल्यावरील लोक सुरक्षितपणे बाहेर पडू शकले नाहीत. या दुर्घटनेत तीन जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजिकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

Comments are closed.