रोहित की नवा कर्णधार? इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या नेतृत्वावर मोठा अपडेट

IND vs ENG Test series: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. याआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. ज्यात संघाची कामगिरी खूपच खराब होती. खराब कामगिरीमुळे कर्णधार रोहितसह संपूर्ण संघाला टीकेचा सामना करावा लागला. मात्र, आता चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर सर्वांनाच उत्तर मिळाले आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या कर्णधारपदाबद्दल एक मोठी अपडेट मिळाली आहे. रोहितबद्दल एक चांगली बातमी आहे.

भारत जून आणि जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी टीम इंडिया आयपीएलनंतर इंग्लंडचा दौरा करेल. इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीनुसार, रोहित या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुन्हा एकदा रोहितकडे जबाबदारी सोपवू शकते. परंतु, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

रोहित शर्माने 2024 च्या टी20 विश्वचषकात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यानंतर त्याने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. शिवाय, त्याने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही स्थान मिळवले. अहवालानुसार, बोर्डाच्या अधिकाऱ्यांना रोहितवर पूर्ण विश्वास आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान रोहितच्या निवृत्तीबद्दल चर्चा झाली होती. पण रोहितने अंतिम सामन्यानंतर निवृत्तीच्या बातम्यांवर पूर्णविराम लावला.

रोहितने टीम इंडियासाठी 67 कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 4302 धावा केल्या आहेत. रोहितने टीम इंडियासाठी कसोटीत 12 शतके आणि 18 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने एक द्विशतकही झळकावले आहे. रोहितने एकदिवसीय सामन्यात 11168 धावा केल्या आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये 273 सामने खेळले आहेत.

Comments are closed.