IPL 2025: विजेतेपदासाठी नव्या नेतृत्वावर भर, या 5 संघांनी बदलले कर्णधार!

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीगला 22 मार्चपासून सुरूवात होणार आहे. यावेळी 10 संघ विजेतेपद जिंकण्यासाठी एकमेकांविरुद्ध स्पर्धा करताना दिसतील. आतापर्यंत आयपीएलचे 17 हंगाम झाले आहेत आणि हा 18 वा हंगाम असेल. आता आयपीएल 2025 च्या आधी, सर्व संघांनी त्यांचे कर्णधार निवडले आहेत. विशेष म्हणजे गेल्या हंगामापासून पाच संघांचे कर्णधार बदलले आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी या संघांचा समावेश आहे.

2024 च्या आयपीएलमध्ये रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारले. त्यानंतर आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी दिल्ली संघाने त्याला कायम ठेवले नाही. याच कारणास्तव दिल्लीने अक्षर पटेलला नवीन कर्णधार बनवले. लखनऊ सुपर जायंट्सने आगामी हंगामासाठी रिषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या हंगामात लखनऊचा कर्णधार केएल राहुल आता दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे.

आयपीएलच्या मागील हंगामात फाफ डु प्लेसिसने आरसीबीचे नेतृत्व केले आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. तरीही आरसीबी संघाने त्याला कायम ठेवले नाही. यानंतर, आरसीबीने युवा फलंदाज रजत पाटीदारला कर्णधार बनवले आहे.
पंजाब किंग्जने अय्यरला खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम मोजली

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल 2024 मध्ये विजेतेपद जिंकले. यानंतरही केकेआरने त्याला कायम ठेवले नाही. त्यानंतर आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. तर आगामी हंगामासाठी केकेआरने अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवले आहे.

आयपीएल 2025 साठी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन हे खेळाडू आहेत. या पाच संघानी आपल्या जुन्या कर्णधारांवर विश्वास व्यक्त केला आहे.

Comments are closed.